(रत्नागिरी / वार्ताहर)
जयगड खाडीवरील गुहागर तालुक्यातील तवसाळ आणि रत्नागिरी परिसराला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी सागरी पुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तब्बल ७१५ कोटी रुपये खर्च करून हा भव्य केबल-स्टेड पूल उभारण्यात येत आहे.
सुमारे २.९ किलोमीटर लांबीच्या या पुलाचे काम पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर रत्नागिरी आणि गुहागर या भागांदरम्यानचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही या पुलाचा मोठा फायदा होणार आहे.
पुलाच्या दोन्ही बाजूंना पादचारी मार्गाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे जयगड खाडीचे विहंगम आणि नयनरम्य दृश्य पुलावरून अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोकणातील समुद्रकिनारी भागात प्रवास करताना कोकणवासीयांसह पर्यटकांना अनेकदा फेरीबोटीवर अवलंबून राहावे लागते. हा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने शासनाकडून विविध खाड्यांवर सागरी पूल उभारण्याचे काम सुरू आहे. जयगड खाडीवरील या पुलामुळे वाहतुकीची सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

