( खेड )
राज्यातील विद्यार्थी आणि युवकांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) खेड तालुक्याच्या वतीने सोमवारी खेड तहसीलदारांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया, ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) संदर्भातील प्रश्न तसेच पोलिस भरती प्रक्रियेतील कथित अनियमिततेमुळे लाखो विद्यार्थी व युवकांचे भविष्य धोक्यात आले असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांची गांभीर्याने दखल घेऊन शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, ब्लॅकलिस्ट अथवा संशयित परीक्षा केंद्रांवर तात्काळ कारवाई करावी, NTA संदर्भातील जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करावी, ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करून पारदर्शक परीक्षा प्रणाली लागू करावी, पोलिस भरती प्रक्रियेतील कथित अन्याय दूर करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा तसेच महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा आवश्यकतेनुसार ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा विचार करावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
यावेळी विद्यार्थी आणि युवकांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) खेड तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. खेडचे तहसीलदार श्री. सोनवणे यांना हे निवेदन सादर करण्यात आले. या प्रसंगी तालुकाध्यक्ष विनायक निकम, शहराध्यक्ष मंगेश भागवत, उपाध्यक्ष चंद्रशेखर हेळगावकर, माजी सरपंच मिलिंद जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते कैलास यादव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन न्याय द्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) खेड तालुक्याच्या वतीने देण्यात आला.

