(पेण)
पेण तालुक्यातील पाबळ गावाजवळील गौळावाडी येथील कृष्णा नामदेव खंडवी (वय 23) हा ईसम 10 ऑक्टोबरपासून बेपत्ता होता, त्याचा कोठेच ठावठिकाणा सापडत नव्हता. सुरुवातीला आपला मुलगा हरविल्याची तक्रार वडील नामदेव खंडवी यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात दिली. मात्र तपासात हा प्रकार प्रेमाच्या खोट्या जाळ्यात रचविलेल्या निर्दयी खुनाचा असल्याचे उघड झाले.
कृष्णाची पत्नी दीपाली (वय 19) नर्सिंग शिक्षणासाठी माणगाव येथे राहत होती. त्यावेळी ओळखीतून तिचे उमेश सदु महाकाळ (वय 21, नाशिक) या तरुणाशी प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर त्यांनी उमेशची मैत्रीण सुप्रिया प्रकाश चौधरी (वय 19, त्र्यंबकेश्वर) हिच्या मदतीने कृष्णाचा खुन करण्याचा कट रचला.
सुप्रियाने “पायल वारगुडे” नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते उघडून कृष्णाशी संपर्क साधला. 10 ऑक्टोबर रोजी नागोठणे येथे भेटायला बोलावून, उमेश आणि सुप्रिया यांनी कृष्णाचे अपहरण केले. वासगावजवळील जंगलात नेऊन उमेशने ओढणीने गळा आवळून त्याची हत्या केली, तर सुप्रियाने रस्त्यावर देखरेख ठेवली. तसेच तो मृत झाल्याचे पाहून मृतदेहाची ओळख न पटण्यासाठी चेहऱ्यावर केमिकल टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला.
15 ऑक्टोबर रोजी स्थानिक ग्रामस्थांना कृष्णाचा मृतदेह नागोठणे शहराच्या पूर्वेकडील जंगलात सापडला. नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल सीडीआर व तांत्रिक तपास करून फक्त ७२ तासांत गुन्हा उघडकीस आणला.
तपासात दीपाली निरगुडे नागोठणे, सुप्रिया चौधरी नाशिक सिन्नर, उमेश महाकाळ गुजरात बॉर्डरवरील हर्सूल येथे अटक करण्यात आली. यामध्ये पीएसआय सूरज पाटील, ग्रे.पीएसआय नरेश थळकर, पोलिस हवालदार महेश लांगी, प्रशांत भोईर, चंद्रशेखर नागावकर, तसेच महिला पो. हेड कॉन्स्टेबल मनिषा लांगी व दीपा पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली.
रायगड पोलीस दलाने सार्वजनिक आवाहन केले आहे की, अपरिचित व्यक्तींवर विश्वास ठेवू नका आणि सोशल मीडियावर ओळख झालेल्या व्यक्तींशी संपर्क साधण्यापूर्वी खातरजमा करा. कोणताही संशय आढळल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात तात्काळ कळवा. या प्रकरणात जलद, तांत्रिक आणि वैज्ञानिक पद्धतीने तपास करून गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे

