(गणपतीपुळे / वैभव पवार)
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजनातील त्रुटींमुळे स्थानिक व्यावसायिक आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पर्यटन विकास आराखड्यांतर्गत ‘आपटा तिठा ते शासकीय विश्रामगृह’ या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले असले तरी पावसाळी पाण्याच्या योग्य निचऱ्यासाठी आवश्यक असलेली पाईपलाईन अद्याप बसवण्यात आलेली नाही.
यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचून जवळील स्टॉल आणि दुकानांमध्ये शिरत असून व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे.
रस्त्याच्या कामादरम्यान पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी काही जागा सोडण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी पुढील निचऱ्यासाठी आवश्यक पाईप बसवण्यात आलेले नाहीत. परिणामी पाणी पुढे न वाहता त्याच भागात साचत आहे.
साचलेले पाणी रस्त्याकडील स्टॉल आणि दुकानांमध्ये शिरत असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. पावसाचा जोर वाढल्यास हीच परिस्थिती अधिक गंभीर होऊन मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर पाणी साचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देशभरातून येणाऱ्या पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
ग्रामपंचायत गणपतीपुळे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाला १२ जून २०२६ रोजी पत्र पाठवून तातडीने पाईपलाईन बसवण्याची मागणी केली आहे. सध्याच्या तुलनेने कमी पावसातच उपाययोजना न केल्यास पुढील काळात परिस्थिती अधिक बिकट होईल, असा इशारा ग्रामपंचायतीकडून देण्यात आला आहे.
आता सार्वजनिक बांधकाम विभाग या समस्येकडे कितपत गांभीर्याने पाहतो आणि तातडीने उपाययोजना करतो का, याकडे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि पर्यटकांचे लक्ष लागले आहे.

