(कोल्हापूर)
विशाळगडावरील वार्षिक उरुसास यंदा प्रशासनाकडून बंदी घालण्यात आल्याने गडावर भाविकांची नेहमीची गर्दी या वर्षी दिसून येत नाही. रविवारपासून सुरू झालेल्या उरुसात भाविकांची संख्या अत्यल्प आहे. गडाकडे जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची पोलीस कसून तपासणी करत आहेत. उरुस नियमांच्या चौकटीतच साजरा केला जाणार असल्याचे दर्गा विश्वस्तांनी स्पष्ट केले.
विशाळगडावर हजरत सय्यद मलिक रेहान बाबा यांचा दर्गा आहे. येथे दरवर्षी ८ ते १२ जून दरम्यान उरुस साजरा केला जातो, ज्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून गडावरील वातावरण तणावपूर्ण असल्याने यंदा हा प्रश्न थेट उच्च न्यायालयात गेला.
किल्ला विशाळगड राज्यसंरक्षित स्मारक असल्याने, सध्या असलेल्या संवेदनशील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य पुरातत्व विभागाच्या संचालकांनी उरुसास परवानगी नाकारली. शाहूवाडी तहसीलदारांनी १५ जूनपर्यंत किल्ला परिसरात जमावबंदी लागू केली आहे. परिणामी, भाविकांनी यंदा गडाकडे पाठ फिरवली.
दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक गडावर दाखल होत असतात, मात्र यंदा त्या तुलनेत फारच कमी गर्दी आहे, असे भाविकांचे म्हणणे आहे. गडाच्या पायथ्याशी उभ्या राहिलेल्या काही वाहनांच्या रांगा आणि पोलिसांकडून होणारी तपासणी यामुळे वातावरण थोडक्याच भाविकांपुरते मर्यादित राहिले आहे. भाविकांची संख्या घटल्यामुळे गडावरील खरेदी-विक्रीलाही मोठा फटका बसला.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उरुस काळात खासगी ठिकाणी बकरे व कोंबड्यांची कत्तल करण्यास अटीशर्तींवर परवानगी देण्यात आली होती. यानुसार, पत्र्याच्या शेडमध्ये एक लहानसा कत्तलखाना उभारण्यात आला होता. येथे ४ बकरी व २३ कोंबड्यांची कत्तल करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दिली.
विशाळगड परिसरात सध्या पोलीस बंदोबस्त अत्यंत कडेकोट ठेवण्यात आला आहे. प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून उरुस शांततेत पार पडण्याची खबरदारी घेतली जात आहे.