(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील वाढती वाहतूक कोंडी, प्रवासी बसेसची वाढती संख्या आणि सुरू असलेल्या रस्ते कामांच्या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने शहरात नव्याने सुरक्षित बसथांबे निश्चित करत वाहतूक शिस्तीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. प्रवाशांची सुरक्षितता, वाहतुकीची सुसूत्रता आणि शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी परिवहन विभाग, पोलीस विभाग आणि खाजगी बस वाहतूकदार यांच्या संयुक्त सर्वेक्षणातून हे नवीन थांबे निश्चित करण्यात आले आहेत.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत या नव्या नियोजनाची माहिती देण्यात आली. सुट्टीच्या हंगामामुळे रत्नागिरी-मुंबई आणि रत्नागिरी-पुणे मार्गावरील प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांची कामे सुरू असल्याने सायंकाळच्या वेळी वाहतूक कोंडी तीव्र होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बसथांबे पुनर्नियोजित करण्यात आले आहेत.
नवीन नियोजनानुसार रेल्वेस्टेशन कॉर्नर आणि कुवारबाव येथील विद्यमान थांबा आता रेल्वेस्टेशन कॉर्नरजवळील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर हलविण्यात आला आहे. सावंत हॉटेल पुढील (टीआरपी) थांबा सुझुकी विघ्नेश्वरा शोरूमसमोर स्थलांतरित करण्यात आला असून, साळवी स्टॉप परिसरात दोन स्वतंत्र थांबे निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये मारुती सुझुकी नेक्सा शोरूमसमोर आणि चिरायू हॉस्पिटलसमोरील शेडजवळ थांब्यांचा समावेश आहे. शिवाजीनगर येथील थांबा बसस्टॉप परिसरात एचडीएफसी बँक व लेन्सकार्ट शोरूमजवळ निश्चित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मारुती मंदिर येथील थांबा पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. विवेक हॉटेलसमोर, शिर्के उद्यानाजवळ तसेच आरडीसीसमोर बांधकाम भवनाजवळील (फक्त शनिवारी) थांबे पूर्ववत ठेवण्यात आले आहेत. रहाटघर बसस्टँड परिसरातील थांबा बसस्थानकाच्या वरील बाजूस निश्चित करण्यात आला आहे.
बैठकीत बस वाहतूकदारांना वाहतूक शिस्तीबाबत कठोर सूचना देण्यात आल्या. केवळ निश्चित थांब्यावरच बसेस थांबवाव्यात, रस्त्यात अनधिकृत थांबे घेऊ नयेत, एकाच वेळी सर्व बसेस न सोडता टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू करावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. तसेच बस थांबविताना वाहतुकीचा अंदाज घेऊन खबरदारी बाळगण्याबाबत चालकांचे समुपदेशन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. याशिवाय वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, परवाना, विमा आणि प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र यांची वैधता नियमित तपासण्याचे निर्देश देण्यात आले. प्रत्येक बसमध्ये आपत्कालीन दरवाजा आणि अग्निशमन यंत्र सुस्थितीत असल्याची खात्री करण्याबाबतही सक्त सूचना करण्यात आल्या.
या बैठकीस मोटार वाहन निरीक्षक प्रशांत जाधव, सुदेश पाटील, केतन पाटील, गजानन कोळी, वाहतूक शाखेचे शिवराय घाग, राजेंद्र लक्ष्मण देवरुखकर यांच्यासह विविध ट्रॅव्हल्सचे संचालक महेश साळवी, हरिश्चंद्र चव्हाण, ऋषिकेश कामत, संदेश निकम, अविनाश खेडेकर, दत्तात्रय कोंडणकर, रुपेश शिंदे, विशाल कदम, यश कांबळे, सागर लिंगायत, अमेय साळवी आदी उपस्थित होते.

