(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील चाफे, निवेंडी, मालगुंड रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे आहे अशी मागणी निवेंडी गावातील प्रसिद्ध आंबा बागायतदार व सामाजिक कार्यकर्ते उल्हास पिंपुटकर यांनी केली आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, जयगड ते रत्नागिरी रोडला जोडणारा मालगुंड ते निवेंडी रत्नागिरी असा रस्ता निसर्गरम्य निवेंडी गावातून जातो.
शंभर वर्षांपूर्वीचा हा रस्ता असून सुद्धा आजही गाव नकाशावर नाही. या रस्त्याचे पाच वर्षात दोनदा डांबरीकरण झाले. हा रस्ता मालगुंड, गणपतीपुळे,वरवडे जयगड पर्यंत जोडला जातो. तसेच या रस्त्याला नेवरे,धामणसे, गणपतीपुळे, मालगुंड कळझोंडी, खंडाळा पोट रस्ते जोडलेले आहेत. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे दर मिनिटाने वाहने या रस्त्यावरून ये जा करीत असतात. परंतु हा रस्ता अरुंद असून मोठी वाहने दुसऱ्या वाहनाच्या बाजूने नेताना पुन्हा मोठी अडचण होते. त्यामुळे या भागात लहान मोठे अपघात होत असतात.
निवेंडी गावात मोठ्या प्रमाणात आंबा, काजू बागायती शेती आहे. येथील शेतकरी मजुरांची ने आण, शेती कामाचे साहित्य, फवारणी यासाठी वाहनांचा वापर करतात, त्यांनाही या अवघड परिस्थितीला सामोरे जावे लागते. चाफे गणपतीपुळे रस्ता हा निवेंडी गावाचे एका बाजूने सांबरेवाडी मार्गे जातो. त्यामुळे पर्यटकांची पहिली पसंती ही निवेंडी मार्गे गणपतीपुळे अशी असते. हा मार्ग सुरक्षित असुन निसर्गसौंदर्य पहात लोकवस्तीतून जाणे अनेकजण हिताचे मानतात.
या कारणाने निवेंडी रस्त्याचे रुंदीकरण झाले तर निश्चितपणे पर्यटकांची वर्दळ वाढेल, शेती, व्यवसाय वाढतील. आंबा काजू पर्यटकांना थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन खरेदी करता येईल. गावचा विकास होईल, मुंबई शहरात जाणारी तरुण पिढी गावात थांबेल. या सगळ्या बाबींचा विचार करून निवेंडी रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे आहे, असे आंबा बागायतदार तथा सामाजिक कार्यकर्ते उल्हास पिंपुटकर यांनी सांगितले .

