(गणपतीपुळे / वैभव पवार)
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या पत्रकारिता पदविका परीक्षेत विद्यापीठात तसेच रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय, वरवडे (भागशाळा खंडाळा) येथील विद्यार्थीप्रिय व ज्येष्ठ मराठी विषयाचे शिक्षक एस. के. जाधव यांचा विद्यापीठाच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला.
विद्यापीठाच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त १ जुलै रोजी आयोजित पारितोषिक वितरण समारंभात कुलगुरू संजीव सोनवणे तसेच प्र-कुलगुरू जोगिंदर विसेन यांच्या हस्ते जाधव सरांना रोख रुपये २,००१, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि विद्यापीठाचा प्रतिष्ठेचा ‘दादासाहेब पोतनीस पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय यशामुळे जाधव सरांनी विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावत हा बहुमान मिळविला. या सोहळ्यास विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एस. के. जाधव हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक म्हणून उत्कृष्ट कार्य करत असतानाच त्यांनी पत्रकारिता, लेखन, सामाजिक प्रबोधन आणि विविध शैक्षणिक उपक्रमांमध्येही मोलाचे योगदान दिले आहे.
याशिवाय लेखक व निर्माता म्हणून त्यांनी तयार केलेल्या ‘निसर्ग’ या लघुपटाला नुकतेच राष्ट्रीय नामांकन प्राप्त झाले असून, कोल्हापूर येथे झालेल्या नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांचा आणि संपूर्ण टीमचा प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
शैक्षणिक, पत्रकारिता आणि सर्जनशील क्षेत्रातील त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार, विविध सामाजिक संस्था तसेच सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

