(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी अनेक दिवस उपलब्ध नसल्याने गेली दोन-तीन दिवस शेतकरी कष्टकरी वर्गातील रुग्णांची फार मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जाकादेवी येथे गेली तीन वर्ष वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ.मीना संपत या काम पाहत होत्या. त्यांचा कार्यकाल संपुष्ट झाला असून त्यांच्या ऐवजी रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागाकडून अधिकृत वैद्यकीय अधिकारी नियुक्त केला नसल्याने येथे छोट्या मोठ्यांसह प्रामुख्याने वृद्ध तसेच अपघातग्रस्त रुग्णांची फार मोठी गैरसोय होऊ लागली आहे.
याआधी येथे कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मीना संपत यांचा या आरोग्य केंद्रातील कार्यकाल ३० जून रोजी संपल्यामुळे त्यांच्या ऐवजी येथील जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकृत वैद्यकीय अधिकारी नियुक्त झाला नसल्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्पुरत्या स्वरूपाचे अन्य प्राथमिक आरोग्यातील डॉक्टर काही तासांसाठी येत असतात. अधिभार दिलेले असे डॉक्टर हे पूर्ण दिवस अथवा रात्रीच्या वेळी उपलब्ध नसल्याने जाकादेवी दशक्रोशीतील सर्वसामान्य गरीब, कष्टकरी, शेतकरी वर्गातील रुग्णांनी नेमके कोणत्या ठिकाणी उपचार घ्यावा ? असा प्रश्न रुग्णांपुढे उभा राहिला आहे. तरी शासनाने सर्वसामान्य जनतेला चांगली सेवा उपलब्ध करून देण्याचा ध्यास घेतला असताना प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्यक्षात वैद्यकीय अधिकारीच नसेल तर उपलब्ध नर्स वर्ग कोणती जबाबदारी घेऊ शकतील? रुग्णांचे कमी जास्त झाल्यास त्याला जबाबदार कोण? गरजू सर्वसामान्य रुग्णांनी उपचारासाठी नेमके कोठे जावे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
तरी रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागाने रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जाकादेवी येथे अधिकृत वैद्यकीय अधिकारी यांची तात्काळ नेमणूक करावी, अशी आग्रही मागणी जाकादेवी ओरी विभागातील युवा नेते संकेत उर्फ बंड्या देसाई यांनी केली आहे.