(रत्नागिरी)
यंदाच्या हंगामात हवामानातील तीव्र बदलांमुळे कोकणातील हापूस आंबा बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अवकाळी पाऊस, अनियमित थंडी आणि त्यानंतर वाढलेल्या प्रचंड तापमानामुळे आंब्याला अपेक्षित मोहर आला नाही. आलेला मोहरही मोठ्या प्रमाणावर काळा पडून गळून गेल्याने जिल्ह्यातील सुमारे ८० टक्के आंबा उत्पादनाचे नुकसान झाल्याचा दावा बागायतदारांनी केला आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी आता प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे.
कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था, रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्था, पावस परिसर आंबा उत्पादक संस्था, आडिवरे मंगलमूर्ती संघ आणि करबुडे रवळनाथ संघ यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे आंबा बागायतदारांच्या नुकसानीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने राज्य शासनाकडे पाठवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, २०१५ पासून आंबा उत्पादकांना सातत्याने विविध नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत असून त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कर्जमाफी तातडीने लागू करावी, तसेच नियमितपणे कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, नुकसानग्रस्त आंबा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी हेक्टरी पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर करावी, अशीही आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शासनाने कर्जमाफीच्या निर्णयात कोणताही भेदभाव न करता सर्व पात्र शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षाही बागायतदारांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करताना ज्येष्ठ बागायतदार प्रकाश साळवी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक आंबा उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

