(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यात केंद्र व राज्य शासन पुरस्कृत महाआवास योजना (रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना) सन २०२४-२५ मध्ये उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींचा व वैयक्तिक लाभार्थ्यांचा गौरव सोहळा नुकताच स्व. शामराव पेजे सांस्कृतिक भवन जिल्हा परिषद रत्नागिरीच्या येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात ग्रामपंचायत धामणसेंला ‘प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण’ अंतर्गत एकावन्न घरकुल मंजूर करून ती पृणत्वाकडे गेले आहे.तालुक्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळाला. याच गावातील सौ. सुवर्णा आत्माराम रहाटे यांना उत्कृष्ट घरकुल लाभार्थी म्हणून गौरविण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे मॅडम यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी प्रकल्प अधिकारी विजयसिंह जाधव आणि गट विकास अधिकारी चेतन शेळके प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाल्या की, रत्नागिरी तालुक्यात घरकुल प्रकल्पांचे काम उत्तम रीतीने पार पडले असून भविष्यात हे काम अधिक प्रभावीपणे होण्यासाठी ग्रामपंचायतींनी प्रयत्नशील राहावे. कोकणातील घरकुल मंजुरीच्या प्रक्रियेत सहहिस्सेदारांच्या संमतीचा प्रश्न सामंजस्याने सोडवून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी केले. भूमिहीन लाभार्थ्यांसाठी उपलब्ध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ग्रामपंचायत धामणसेंचे सरपंच अमर रहाटे, तत्कालीन उपसरपंच अनंत जाधव, सदस्या सौ. ऋतुजा उमेश कुळकर्णी, सौ. वैष्णवी विलास धनावडे, सदस्य समीर सांबरे व संजय गोनबरे ग्रामविकास अधिकारी इंगळे यांनी उपस्थित राहून गौरवाचे क्षण सामायिक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेनुसार शेवटच्या व्यक्तीपर्यंत शासनाचा निधी पोहोचवून खर्च करण्याचे काम सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आपापल्या परीने प्रामाणिकपणे करत असल्यानेच ग्रामपंचायत धामणसेंला हे यश मिळाले आहे. गावकऱ्यांनी या कामांना नेहमीच सक्रिय पाठिंबा दिला असून ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या एकजुटीनेच हे यश शक्य झाले आहे. येत्या काळातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध राहील, असे सरपंच अमर रहाटे यांनी सांगितले. या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामपंचायत धामणसें व ग्रामस्थांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.