(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देत दक्षिण रत्नागिरीतील काही पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र राजकीय वाटचालीचा निर्णय घेत ‘युवा क्रांती सेना’ या नव्या पक्षाची स्थापना केली आहे. पक्षाचे संयोजक जुनेद बंदरकर यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका, उद्दिष्टे आणि आगामी राजकीय दिशा स्पष्ट केली.
कोकणची अस्मिता, स्थानिकांचा स्वाभिमान, रोजगारनिर्मिती, पर्यावरण संरक्षण आणि युवकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला केंद्रस्थानी ठेवून हा पक्ष कार्यरत राहणार असल्याचे बंदरकर यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेतून प्रेरणा घेत पक्षाची वाटचाल होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘युवा क्रांती सेना’ ही केवळ राजकीय संघटना नसून कोकणातील जनतेच्या अपेक्षा आणि प्रश्नांना न्याय देणारे लोकचळवळीचे व्यासपीठ असेल, असा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला. पक्षात कोणत्याही प्रकारची ‘हाय-कमांड’ संस्कृती नसेल. निर्णयप्रक्रियेत स्थानिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांचा थेट सहभाग असेल, अशी भूमिकाही यावेळी मांडण्यात आली.
मनसेमधून बाहेर पडण्यामागील कारणांवर भाष्य करताना बंदरकर म्हणाले की, स्थानिक प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची गरज असताना प्रत्येक बाबीसाठी वरिष्ठांच्या परवानगीची प्रतीक्षा करावी लागत होती. कोकणातील शेतकरी, मच्छीमार, कष्टकरी आणि युवकांच्या समस्या दूर करण्यासाठी स्थानिक पातळीवरील नेतृत्वाला अधिक स्वायत्तता आवश्यक असल्याची जाणीव झाल्याने सामूहिक निर्णयातून नव्या पक्षाची स्थापना करण्यात आली. “मुंबईतील वातानुकूलित कार्यालयांमधून कोकणातील वास्तव समजणे आणि येथील प्रश्नांची प्रभावी उकल करणे शक्य नाही. स्थानिकांच्या भावना, गरजा आणि अपेक्षा यांचा थेट विचार करणारे नेतृत्व निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे,” असेही बंदरकर यांनी स्पष्ट केले.
सत्ताकारण नव्हे, तर विकासकारण हेच पक्षाचे प्रमुख ध्येय असल्याचे सांगत त्यांनी आगामी ग्रामपंचायत निवडणुकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. गावांचा सर्वांगीण विकास हा जिल्ह्याच्या प्रगतीचा पाया असल्याने स्थानिकांच्या मतांचा आदर राखत आणि त्यांच्या सहभागातून निवडणूक रणनिती आखली जाईल, असे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला पक्षाचे कार्याध्यक्ष सचिन शिंदे, सरचिटणीस शकील गवाणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दक्षिण रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात ‘युवा क्रांती सेना’च्या स्थापनेमुळे नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

