(मुंबई)
गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा (NMC Election 2025) सविस्तर कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. या घोषणेसह आजपासून संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना आयुक्त वाघमारे म्हणाले की, ३१ जानेवारीपूर्वी ज्यांची मुदत संपली आहे अशा महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आज २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील २७ महापालिकांची मुदत संपली असून जालना व इचलकरंजी या नव्या महापालिका आहेत.
महापालिका निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे ऑफलाईन पद्धतीने स्वीकारली जाणार आहेत. तसेच निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना सहा महिन्यांच्या आत जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मतदार व मतदान केंद्रांची माहिती
या निवडणुकीसाठी राज्यात एकूण ३ कोटी ४८ लाख १७ हजार मतदार असून, ३९ हजार १४७ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेसाठी १० हजार १११ मतदान केंद्रे असणार आहेत. निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदार यादी वापरण्यात येणार असून, दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार चिन्ह लावण्यात आले आहे.
२९ महापालिकांसाठी एकूण २ हजार ८६९ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
त्यामध्ये –
- महिला आरक्षण : १,४४२ जागा
- अनुसूचित जाती (SC) : ३४१ जागा
- अनुसूचित जमाती (ST) : ३७७ जागा
- नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) : ७५९ जागा
महापालिका निवडणूक वेळापत्रक
- उमेदवारी अर्ज दाखल : २३ ते ३० डिसेंबर २०२५
- अर्जांची छाननी : ३१ डिसेंबर २०२५
- उमेदवारी माघार : २ जानेवारी २०२६
- मतदान : १५ जानेवारी २०२६
- मतमोजणी : १६ जानेवारी २०२६

