(नांदेड)
सक्षम ताटे हत्या प्रकरणातील तपास व कारवाई यामध्ये काहीच प्रगती होत नसल्याने बुधवारी दुपारी धक्कादायक घटना घडली. मृत सक्षम ताटेची आई संगीता ताटे आणि प्रेयसी आंचल मामीडवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, या घटनेमुळे नांदेड शहरातील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
नांदेड शहरातील सक्षम ताटे याची २७ नोव्हेंबर रोजी आंतरजातीय प्रेम प्रकरणातून निर्घृण हत्या करण्यात आली होती. गोळ्या झाडून आणि फरशीने डोके ठेचून केलेल्या या हत्येने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणात आंचलचे वडील, भाऊ आणि इतर सहकाऱ्यांसह एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हत्यानंतर आंचल मामीडवार हिने सक्षमच्या मृतदेहासोबत विवाह केल्याने हे प्रकरण राज्यभर चर्चेत आले. आंचलने आपल्या वडिलांना आणि भावाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. मात्र, अटक असलेल्या आरोपींपैकी एका आरोपीचे इंस्टाग्राम अकाउंट अजूनही सक्रिय असल्याचे समोर आले आहे. ‘हिमेश मामीडवार 302’ उर्फ ‘हिम्या शूटर’ या आरोपीचे सोशल मीडियावर हातात बेड्या असलेले फोटो पोस्ट केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणात आणखी गंभीर आरोप समोर आले आहेत. इतवारा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी माही दासरवाड आणि धीरज कोमूलवाड यांनी सक्षम ताटेच्या हत्येसाठी चिथावणी दिल्याचा आरोप आंचल मामीडवार हिने केला आहे. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी सक्षमची आई आणि आंचल गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. मात्र, या मागणीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
१७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन २४ डिसेंबरपर्यंत कारवाई करा, अन्यथा आत्मदहन करू, असा इशारा त्यांनी दिला होता. मात्र, आजही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने बुधवारी दुपारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत दोघींनाही आवरल्याने मोठी दुर्घटना टळली.
या घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांनी पोलिस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. सक्षम ताटे हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने अटक करा, अशी मागणी कुटुंबीयांनी पुन्हा एकदा लावून धरली आहे.
दरम्यान, “आज आम्हाला रोखण्यात आले, पण यापुढे कधीही टोकाचे पाऊल उचलू,” असा गंभीर इशारा सक्षमची आई संगीता ताटे आणि आंचल मामीडवार यांनी दिला आहे. या घटनेमुळे प्रकरणाची संवेदनशीलता आणि प्रशासनाची जबाबदारी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

