(मुंबई / प्रतिनिधी)
आई भगवती श्री वज्रेश्वरीच्या चरणी लाखो सेवेकर्यांनी आज रुजू केलेल्या वज्रचंडी यज्ञ, दुर्गा सप्तशती पठण आणि श्री चक्रराज श्रीयंत्र सेवेमुळे देशाच्या संरक्षणाबरोबरच विश्वशांती नांदेल आणि अखिल मानव समाज सुखी होईल असा विश्वास अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख श्री.अण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केला, तेव्हा उपस्थित लाखो सेवेकर्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून सारा आसमंत दणाणून टाकला.
भिवंडी तालुक्यातील श्री क्षेत्र वज्रेश्वरी येथे स्वामी सेवामार्ग तर्फे आज १८ मार्च रोजी विश्वशांती, जनहित आणि राष्ट्रकल्याणासाठी राष्ट्रीय महासत्संग सोहळा तथा वज्रचंडी यज्ञ, दुर्गा सप्तशती पठण आणि श्री चक्रराज श्रीयंत्र पूजनची अतिउच्च सेवा उत्साही वातावरणात पार पडली. या सेवेमध्ये संपूर्ण देशभरातून लाखो सेवेकरी सहभागी झाले होते. परमपूज्य गुरुमाऊली श्री.अण्णासाहेब मोरे यांच्या दिव्य सानिध्यात ही सेवा झाल्यामुळे सेवेकऱ्यांचा आनंद द्विगुणीत झाला.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना गुरुमाऊली श्री मोरे यांनी सेवामार्गाच्या गेल्या सात दशकातील ठळक कार्याचा आढावा घेतला. सेवामार्गाने सम सकला पाहू ही वृत्ती कायम जोपासली तर भारतीय संस्कृती समृद्ध करण्यासाठी योगदान दिले. शिवाय माणुसकीच्या संस्कृतीला सर्वोच्च प्राधान्य दिले. सेवा मार्गात शिशू संस्कार, बालसंस्कार आणि गर्भसंस्कार रुजवण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून समाज, देश आणि धर्म रक्षणासाठी बहुविध उपक्रमाचे सातत्याने आयोजन केले जाते, त्याच उदात्त भावनेतून आजची सेवा भगवतीच्या चरणी रुजू करण्यात आली असे गुरुमाऊली श्री मोरे यांनी नमूद केले.
परमपूज्य गुरुमाऊलींची ग्रंथतुला
अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांची ग्रंथ, धान्य आणि मिष्ठान्नाची तुला करण्यात आली. योगायोग म्हणजे मीष्ठानाच्या तुलेमध्ये तिरुपतीच्या लाडवाचा प्रसाद होता आणि व्यासपीठावर साकारण्यात आलेली तिरुपती देवस्थानाची प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी गुरुमाता सौ मंदाताई तथा काकूसाहेब मोरे यांनी परमपूज्य गुरुमाऊलींचे औक्षण केले तेव्हा तमाम सेवेकर्यांनी वंदन करून गुरुमाऊलींना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली. हा सोहळा अत्यंत हृदयस्पर्शी आणि भावपूर्ण झाला.
कपिल पाटील, अनिकेत तटकरे यांच्या शुभेच्छा
माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी शुभेच्छा देताना परमपूज्य गुरुमाऊलींच्या मानवतावादी सेवाभावी कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. देशासाठी करण्यात आलेल्या सर्वोच्च सेवेत सहभागी होता आले याचा विशेष आनंद वाटतो अशी भावनाही या मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला व्यासपीठावर गुरुपुत्र श्री नितीन भाऊ मोरे, आमदार शांताराम मोरे, पिंपरी चिंचवडचे माजी महापौर राहुल जाधव, माजी आमदार राजेश पाटील, कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, त्यांची पत्नी स्मिताताई शिंगारे यांच्यासह वज्रेश्वरी देवस्थान संस्था, स्वामी नित्यानंद देवस्थानचे पुजारी आणि विश्वस्त तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
प्रदीर्घ कालखंडानंतर सर्वोच्च सेवा
श्री वज्रेश्वरी शक्तिपीठावर रामायण कालात त्यानंतर नवनाथांच्या काळात मोठी सेवा झाली.त्यानंतर प्रदीर्घ काळानंतर परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली 108 कुंडात्मक वज्र चंडीयज्ञ,दुर्गा सप्तशती पठण,सवाष्ण कुमारिका पूजन चक्रराज श्री यंत्र पूजन अशी भव्य दिव्य आध्यात्मिक सेवा पार पडली.