( देवरूख )
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील प्रसिद्ध सोने व्यापारी धनंजय केतकर यांच्या अपहरण व लुटीच्या खळबळजनक प्रकरणात देवरूख पोलिसांना आणखी एक महत्त्वाचे यश मिळाले आहे. या प्रकरणातील शुभम दत्ता सुनेवाड (रा. वसरणी, ता. जि. नांदेड) या आरोपीला नांदेड येथून सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे या गुन्ह्यातील अटक आरोपींची संख्या नऊ वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ११ वाजता देवरूख–साखरपा मार्गावरील वांझोळे परिसरात धनंजय केतकर यांचे अपहरण करण्यात आले होते. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळवण्यासाठी आखलेल्या या कटामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली होती. घटनेनंतर देवरूख पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.
तपासादरम्यान साखरपा येथील दोन स्थानिक व्यक्तींवर संशय बळावल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर हे अपहरण आणि लुटीचे रॅकेट मुंबईतील बदलापूरपर्यंत पसरलेले असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी टप्प्याटप्प्याने कारवाई करत आठ आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी नांदेड येथे लपून बसल्याची माहिती देवरूख पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने नांदेड येथे धाड टाकून सोमवारी रात्री शुभम सुनेवाड याला अटक केली. पुढील चौकशीसाठी त्याला देवरूख येथे आणण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणातील आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
देवरूख पोलिसांच्या या सलग कारवायांमुळे अपहरण व लुटप्रकरणातील गुन्हेगारी साखळी उघडकीस आली असून, उर्वरित बाबींचा सखोल तपास सुरू आहे.

