(मंडणगड)
तालुक्यातील भिंगळोली येथील भारती अपार्टमेंटमध्ये २० मार्च रोजी एका अज्ञाताचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाच्या खिशात असलेल्या कागदांमधील फोन नंबरवर संपर्क साधल्यानंतर या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. हा मृतदेह दुधेरे (ता. मंडणगड) येथील अभिजीत भाऊ कदम (४०) यांचा आहे.
अभिजितच्या आईने मृतदेहाची ओळख पटवून देत मंडणगड पोलिस स्थानकात याबाबत माहिती दिली आहे. अभिजीत कदम यांना दारू पिण्याची सवय होती. ते १५ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमाराला ठाणे येथे कामासाठी जात असल्याचे आईला सांगून बाहेर पडले होते. त्यानंतर ते २० मार्च रोजी भारती अपार्टमेंटच्या खोली क्रमांक ३ भिंगळोली येथे मृतावस्थेत आढळले. मात्र, ते येथे कसे व का आले? याचा उलगडा झालेला नाही.
याप्रकरणी मंडणगड पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक नितीन गवारे मार्गदर्शनाखाली यांच्या अधिक तपास सुरू आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.