(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी)
चिपळूण-कराड महामार्गावर पादचाऱ्याला भरधाव चारचाकीने जोरदार धडक देऊन चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याची धक्कादायक घटना पिंपळी खुर्द येथे घडली. अपघातानंतर जखमीला कोणतीही वैद्यकीय मदत न करता वाहनचालक फरार झाल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी अज्ञात निळ्या रंगाच्या चारचाकी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जून रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास पिंपळी खुर्द येथील शार्दल एंटरप्रायझेससमोरील चिपळूण-कराड महामार्गावर पार्श्व अमर गरुड (वय १९, रा. पिंपळी खुर्द, ता. चिपळूण) आणि त्याचा मित्र शिवम राजकुमार सिंग (वय १८, मूळ रा. सिडको लेखानगर, हनुमान चौक, नाशिक; सध्या रा. पिंपळी खुर्द) हे पायी रस्ता ओलांडत असताना भरधाव निळ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने पार्श्व याला जोरदार धडक दिली. धडकेनंतर शिवम सिंग यांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने त्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून वाहन न थांबविता घटनास्थळावरून पलायन केले. तसेच जखमीला कोणतीही वैद्यकीय मदतही न पुरविता तो पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या अपघातात पार्श्व गरुड जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शिवम राजकुमार सिंग यांच्या फिर्यादीवरून अज्ञात निळ्या रंगाच्या चारचाकी वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २८१, १२५(अ), १२५(ब), १३४(अ), १३४(ब) तसेच मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १८४ अन्वये गुन्हा क्रमांक १९४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. फरार वाहनचालकाचा शोध सुरू असून पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.

