(चिपळूण)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रावतळे–विंध्यवासिनी रस्त्यानजिक आज (गुरुवारी) सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास लोखंडी सामान वाहून नेणारा एक टेम्पो अचानक पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पोतील लोखंडी साहित्य गाडीच्या पुढील बाजूकडून घसरत थेट रस्त्यावर पसरले. याच वेळी मागून येणारा एक मोटारसायकलस्वार या सांडलेल्या साहित्यावर पडण्यापासून थोडक्यात बचावला. प्रसंगावधान राखत त्याने वेळेत वाहन बाजूला घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, शाळेची बसही त्याच मार्गावरून जात होती. रस्त्यावर पसरलेल्या लोखंडी साहित्यामुळे बसचालकाला वाहन वळसा घालून पुढे न्यावे लागले.
या महामार्गावर वारंवार अपघात घडत असल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाहतूक नियोजन, अवजड वाहनांच्या सुरक्षिततेची तपासणी आणि नियंत्रण याबाबत प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

