(चिपळूण / रत्नागिरी)
सावर्डे येथून बेपत्ता झालेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. मुलीसह संबंधित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले आहे. चिपळूण, रत्नागिरी आणि सावर्डे पोलिसांनी संयुक्तपणे राबविलेल्या शोधमोहिमेनंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणामुळे गेल्या रात्रीपासून सावर्डे गावात निर्माण झालेला तणाव आणि संतापाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
इयत्ता आठवीत शिकणारी १३ वर्षीय मुलगी सावर्डे येथून बेपत्ता झाल्याची बातमी परिसरात पसरल्यानंतर तिचे अपहरण झाले की तिला कोणी पळवून नेले, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. मुलगी बेपत्ता नसून तिला पळवून नेण्यात आल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला होता. मंगळवारी रात्री या प्रकरणावरून दोन गटांमध्ये मोठा राडा झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर गावात संतापाची लाट उसळली होती.
‘आमच्या मुलीला आमच्या ताब्यात द्या, अन्यथा ज्यांनी हा प्रकार केला आहे, त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांनाही सोडणार नाही,’ असा इशारा मुलीच्या नातेवाईकांनी दिला होता. काल सायंकाळनंतर अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचे समोर आल्यानंतर गावातील वातावरण अधिक तणावपूर्ण झाले होते. गेल्या रात्रीपासून सावर्डे परिसरात तणावाचे वातावरण होते.
दरम्यान, मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी क्यूआरटी (QRT) पथकाची नियुक्ती केली होती. चिपळूण, रत्नागिरी आणि सावर्डे पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम राबवली. या मोहिमेत मुलगी आणि संबंधित युवकाचा शोध लागल्यानंतर दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. मुलीला महिला पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित युवकाला अटक करण्यात येणार असल्याचे समजते.


