(गुहागर)
तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नैसर्गिक आपत्तींच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि घरांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
अंजनवेल बौद्धवाडी मुख्य रस्त्यावर दरड कोसळल्याने परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्रभर मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास आणखी मोठी दरड कोसळून हा मुख्य मार्ग पूर्णपणे बंद होण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात येत आहे.
दरम्यान, मौजे पाचेरी येथील आगर काजरोळकरवाडी रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली. मौजे गुहागर येथील विलास बाळकृष्ण नार्वेकर यांच्या घराचे अंशतः नुकसान झाले असून, या घटनेत सुमारे ३५ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
यापूर्वी पाभरे खुर्द येथे सुरेश पांडुरंग आगरे यांच्या गोठ्यावर झाड कोसळल्याने गोठ्याचे नुकसान झाले होते. तसेच विजय रत्नाकर पाष्टे यांच्या घरालगतची संरक्षण भिंतही कोसळली आहे.
दरम्यान, तालुक्यातील अनेक गावांकडे जाणाऱ्या एसटी मार्गांलगत झाडी मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. काही ठिकाणी रस्त्यालगतची झाडी अद्याप छाटण्यात आलेली नसल्याने वाहनचालकांसह एसटी चालकांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने झाडांची छाटणी करून रस्ते सुरक्षित करावेत, अशी मागणी होत आहे.

