(मुंबई / रामदास गमरे)
बौद्धजन सहकारी संघ (रजि.), मुंबई व गुहागर तालुका संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत आयोजित वर्षावास प्रवचन मालिका २०२५ यावर्षी ऑनलाईन (Google Meet) तसेच शृंगारतळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली. याचा सांगता समारंभ मुंबई शाखा अध्यक्ष सुरेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली दादर (पूर्व) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झाला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्कार समिती अध्यक्ष संदीप गमरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दीपप्रज्वलन करून व बुद्धवंदना पठणाने केली. सरचिटणीस संदेश गमरे व सचिन मोहिते यांनी ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केले. तालुका चेअरमन दीपक मोहिते यांनी गेल्या आठ वर्षांत संघाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
यावेळी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या विशेष कामगिरीचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये –
कु. आर्या मनोज जाधव (गुहागर) – राष्ट्रीय स्तरावरील हिंदी वक्तृत्व स्पर्धेत देशात चौथा व महाराष्ट्रात पहिला क्रमांक.
कु. निधी राजेश पवार (वरवेली) – कंपनी सेक्रेटरी (CS) परीक्षेत देशभरातून २४ वा क्रमांक.
कु. पूनम संतोष मोहिते (कौंढर-काळसूर) – राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत जिल्हा संघाचे नेतृत्व.
कु. डॉ. मधुरीमा जाधव – महाराष्ट्र शासन मत्स्य विभागात सहाय्यक आयुक्त पदावर नियुक्ती.
कु. सुषमा विजय जाधव – न्यायाधीश पदावर नियुक्ती.
या यशस्वी कामगिरींच्या गौरवार्थ प्रथमच ‘भीमकन्या गौरव पुरस्कार – २०२५’ जाहीर करण्यात आला. ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांचा सत्कार या समारंभात झाला तर मुंबईतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव डिसेंबरमध्ये होणार आहे.
सदर प्रसंगी गुहागर तालुक्याची कन्या आर्या मनोज जाधव हिला ‘भीमकन्या गौरव पुरस्कार – २०२५’ प्रदान करण्यात आला. आभारप्रदर्शन करताना आर्याने हिंदी व इंग्रजी भाषेतून, तर निधी पवारने इंग्रजीतून विद्यार्थ्यांना अभ्यासाची दिशा व प्रोत्साहनपर विचार मांडले.
मुख्य वक्ते संजय पवार यांनी “बौद्ध धम्म आणि धम्माची ओळख” या विषयावर विचार मांडताना पंचशील, अष्टशील, दशशील आणि आर्यअष्टांग मार्ग अंगीकारल्यास आदर्श जीवन जगता येते, असे स्पष्ट केले.
या वेळी प्रमुख विश्वस्त, पदाधिकारी, गाव शाखा प्रतिनिधी, महिला मंडळ, मध्यवर्ती कमिटीसह मोठ्या संख्येने उपस्थितांनी तुफान पावसाची पर्वा न करता सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे आभार सरचिटणीस संदेश गमरे यांनी मानले.

