(गुहागर / वार्ताहर)
रत्नागिरी पोलीस दलाच्या ‘मिशन जीवन’ उपक्रमांतर्गत गुहागर पोलीस स्टेशनच्या वतीने उमराठ गावातील ६५ वर्षांवरील १७ ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवसानिमित्त प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ आणि शुभेच्छा देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम मंगळवारी (दि. ३० जून २०२६) ग्रामपंचायत उमराठ कार्यालयात उत्साहात पार पडला.
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ‘मिशन जीवन’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रमाणपत्रावर, “आपले आयुष्य आरोग्य, आनंद आणि समाधानाने परिपूर्ण असो. आपल्या चेहऱ्यावरील हास्य सदैव असेच खुलत राहो आणि आपला आशीर्वाद आम्हाला नेहमी लाभत राहो,” असा शुभेच्छा संदेश देण्यात आला आहे.
तसेच, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी रत्नागिरी पोलीस दलाने सुरू केलेल्या ‘मिशन प्रतिसाद’ उपक्रमाची माहिती देत ८३९०९२९१०० हा हेल्पलाइन क्रमांकही प्रमाणपत्रावर नमूद करण्यात आला आहे.
प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाच्या वाढदिवशी स्वतंत्र कार्यक्रम घेणे शक्य नसल्याने संबंधित महिन्यात वाढदिवस असलेल्या गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा एकत्रित सन्मान करण्याची पद्धत राबविण्यात येते. त्यानुसार जून २०२६ महिन्यात वाढदिवस असलेल्या उमराठ गावातील १७ ज्येष्ठ नागरिकांचा यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला हेदवी गावचे पोलीस पाटील तथा उमराठ गावाचे प्रभारी रविंद्र मोहित, ग्रामपंचायत उमराठचे प्रशासक जनार्दन आंबेकर, गुहागर पंचायत समितीचे सदस्य संदीप गोरिवले, ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश्वर लेंडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम आणि साईस दवंडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

