(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुलाचे लग्न जुळत नसल्याच्या मानसिक तणावातून बेपत्ता झालेल्या परचुरी येथील ५४ वर्षीय विवाहित महिलेचा डिंगणी खाडीपात्रात मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सौ. अंजनी अर्जुन वेद्रे (वय ५४, रा. परचुरी वेद्रेवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत महिलेचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परचुरी गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौ. अंजनी वेद्रे या गेल्या काही दिवसांपासून मुलाचे लग्न जुळत नसल्याने मानसिक तणावाखाली होत्या. याच तणावातून २६ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ९.३० ते दुपारी १२.३० च्या दरम्यान त्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्या होत्या.
घरातून बाहेर गेल्यानंतर त्या बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पती अर्जुन यशवंत वेद्रे व नातेवाईकांनी परिसरात शोधमोहीम राबवली. मात्र त्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.
डिंगणी खाडीपात्रात मृतदेह आढळला
दरम्यान, डिंगणी परिसरातील खाडीपात्रात काठाजवळ एक मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली असता, मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. तो मृतदेह बेपत्ता सौ. अंजनी वेद्रे यांचाच असल्याची पुष्टी झाल्यानंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
पोलिसांकडून पंचनामा, शवविच्छेदन
घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. डिंगणी उपक्षेत्राचे तपासिक अंमलदार अरुण बी. वानरे यांनी पथकासह पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील अंत्यसंस्कार पार पडले. या घटनेनंतर परचुरी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

