(मुंबई)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढील वर्षापासून पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. TET 2026 पेपरफुटी प्रकरणानंतर राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली.
पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय
TET 2026 प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त झाला होता. या मुद्द्यावर विधानसभेसह विधान परिषदेतही विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. त्यानंतर सभागृहात भूमिका स्पष्ट करत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी भविष्यात पेपरफुटीसारख्या घटना टाळण्यासाठी TET परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन करण्याचा निर्णय जाहीर केला.
फेरपरीक्षा पूर्णपणे मोफत
दादा भुसे यांनी स्पष्ट केले की, पेपरफुटीमुळे रद्द झालेली TET 2026 फेरपरीक्षा सर्व उमेदवारांसाठी पूर्णपणे मोफत असेल. या परीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. सरकारच्या म्हणण्यानुसार, फेरपरीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात घेण्यात येईल.
सर्व महत्त्वाच्या परीक्षा टप्प्याटप्प्याने ऑनलाइन
शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, TETपुरतीच नव्हे तर राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या इतर महत्त्वाच्या परीक्षाही टप्प्याटप्प्याने ऑनलाइन प्रणालीकडे वळविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी आवश्यक तांत्रिक आणि प्रशासकीय पायाभूत सुविधा उभारण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे.
ऑनलाइन परीक्षा योग्य, पण तयारी महत्त्वाची
‘अखिल भारतीय शिक्षक संघा’चे सरचिटणीस संजय कांबळे यांनी ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, राज्यभर पुरेशी ऑनलाइन परीक्षा केंद्रे, सक्षम तांत्रिक सुविधा आणि विशेषतः ग्रामीण भागातील उमेदवारांसाठी मॉक टेस्टची व्यवस्था करणे गरजेचे आहे. तसेच, फेरपरीक्षा कोणतेही शुल्क न आकारता निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने घेण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
TET पेपरफुटीनंतर परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असताना, ऑनलाइन परीक्षा प्रणालीमुळे भविष्यात पेपरफुटीला आळा बसेल का, याकडे आता लाखो उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

