(पुणे / लोणावळा)
लोहगड किल्ल्यावर घडलेल्या बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना वडगाव मावळ न्यायालयाने 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपासासाठी वेळ आवश्यक असल्याचे सांगत लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर ती मंजूर केली.
अपघाताच्या संशयातून हत्येपर्यंत तपास
सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, तपासादरम्यान घटनास्थळावरील पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे प्रकरणाने हत्येचे स्वरूप धारण केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करून सखोल चौकशी सुरू केली.
डिजिटल पुरावे आणि कटाचा तपास
लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार, पोलीस कोठडीदरम्यान आरोपींच्या मोबाईलमधील माहिती, डिजिटल पुरावे, कॉल रेकॉर्ड, गुन्ह्यापूर्वी आणि गुन्ह्यानंतरच्या हालचाली तसेच हत्येमागील कथित कटाचा तपास केला जाणार आहे. याशिवाय घटनास्थळाची पुन्हा पाहणी, आरोपींच्या जबाबांची पडताळणी आणि इतर संभाव्य संबंधित व्यक्तींशी असलेल्या संपर्कांचाही तपास सुरू आहे.
या प्रकरणात केतन अग्रवाल यांच्या कुटुंबाच्या बाजूने अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर आरोपी सिया गोयल हिची बाजू अॅड. आशुतोष श्रीवास्तव आणि चेतन चौधरी याची बाजू अॅड. राम शहाणे यांनी न्यायालयात मांडली. तपास यंत्रणा सध्या उपलब्ध पुरावे, घटनाक्रम आणि आरोपींच्या कथित भूमिकेची साखळी मजबूत करण्यावर भर देत आहे. त्यामुळे पोलीस कोठडीच्या कालावधीत या प्रकरणात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

