(मुंबई)
एखादी व्यक्ती आपल्या नातेवाईक, ओळखीच्या व्यक्तीला किंवा मित्राला रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी गेली तर त्याला प्लॅटफॉर्म तिकीट घेणे बंधनकारक असते. अन्यथा रेल्वे विभागाकडून आपल्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. मात्र दिवाळी आणि छठ पूजेच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर वाढलेल्या प्रचंड गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय रेल्वेने कठोर पाऊल उचलले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), बांद्रा टर्मिनस तसेच इतर प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट विक्री तात्पुरती बंद करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेने १५ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मुंबईतील बांद्रा टर्मिनल, तसेच गुजरातमधील वापी, उधना आणि सूरत स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, “सणांच्या काळात वाढणारी गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही बंदी अत्यावश्यक आहे.”
मध्य रेल्वेनेही १६ ते २८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सीएसएमटी, दादर, लोकमान्य तिलक टर्मिनस (एलटीटी), ठाणे, कल्याण आणि पनवेल या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की, सणासुदीच्या गर्दीत प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुव्यवस्थित राहावा, यासाठीच ही उपाययोजना करण्यात आली आहे.
रेल्वेने स्पष्ट केलं आहे की, काही विशेष प्रवाशांच्या सहाय्यकांना मात्र सवलत दिली जाणार आहे. यामध्ये — ज्येष्ठ नागरिक, आजारी प्रवासी, दिव्यांग प्रवासी, लहान मुलांसह प्रवास करणारे, तसेच विशेष काळजीची गरज असणाऱ्या प्रवाशांचे सहाय्यक —
यांना आवश्यकतेनुसार प्लॅटफॉर्म तिकिटे देण्यात येतील.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बांद्रा टर्मिनलवर गाडीत चढण्याच्या घाईत झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ प्रवासी जखमी झाले होते. यंदा अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आगाऊ नियोजन करून गर्दी नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना केली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना प्लॅटफॉर्मपर्यंत सोडणाऱ्या नातेवाईकांना आता जाता येणार नाही. मात्र, सुरक्षितता आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय स्वागतार्ह असल्याचं सर्वसाधारण मत व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केलं आहे की, “सणासुदीच्या काळात स्थानकांवरील नियमांचे पालन करा आणि रेल्वे कर्मचार्यांना सहकार्य करा.”

