( मुंबई )
TET पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MahaTET) पुन्हा घेण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेला किमान दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या विलंबाचा सर्वाधिक फटका सध्या कार्यरत असलेल्या 2 लाख 26 हजार शिक्षकांना बसणार असून, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऑगस्ट 2028 पर्यंत TET उत्तीर्ण होण्याच्या मुदतीमुळे त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
6 लाखांहून अधिक उमेदवारांना फटका
पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या परीक्षेसाठी राज्यभरातून 6 लाख 125 उमेदवारांनी नोंदणी केली होती. यामध्ये 3 लाख 46 हजार अर्ज कार्यरत शिक्षकांचे होते. अनेक शिक्षकांनी दोन्ही पेपरसाठी अर्ज केल्याने अर्जांची संख्या जास्त असली, तरी प्रत्यक्ष शिक्षक उमेदवारांची संख्या 2 लाख 26 हजार इतकी आहे. सर्वोच्च न्यायालयाने नोकरी कायम ठेवण्यासाठी ऑगस्ट 2028 पर्यंत TET उत्तीर्ण होणे अनिवार्य केल्यामुळे यंदा विक्रमी अर्ज दाखल झाले होते. आता परीक्षा पुढे ढकलल्यामुळे या शिक्षकांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुन्हा परीक्षा घेण्यासाठी दोन महिने लागण्याची शक्यता
राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनुसार, नवीन प्रश्नपत्रिका तयार करणे, गोपनीय छपाई, परीक्षा केंद्रांचे नियोजन, नवीन वेळापत्रक निश्चित करणे आणि इतर परीक्षा तसेच पावसाचा विचार करून तारीख निश्चित करावी लागणार आहे. त्यामुळे परीक्षा पुन्हा आयोजित करण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
उत्तरपत्रिका परत जमा, प्रश्नपत्रिका ट्रेझरीतच
परीक्षा रद्द झाल्यानंतर परिषदेने रविवारी राज्यातील 37 परीक्षा जिल्हा नियोजन केंद्रांमधून सर्व कोऱ्या उत्तरपत्रिका परत जमा करून घेतल्या. मात्र, जिल्हा ट्रेझरीमध्ये सीलबंद ठेवलेल्या प्रश्नपत्रिकांबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
‘पेपर-2’साठी सर्वाधिक अर्ज
यंदाच्या महाटीईटी परीक्षेत प्राथमिकपेक्षा उच्च प्राथमिक स्तरासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘पेपर-2’साठी सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या मुदतीमुळे कार्यरत शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
पुन्हा परीक्षेमुळे कोट्यवधींचा अतिरिक्त खर्च
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, TET परीक्षेचे नियोजन करण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेला साधारण 7 ते 8 कोटी रुपयांचा खर्च येतो. प्रश्नपत्रिका छपाई, उत्तरपत्रिका, वाहतूक, सुरक्षा, सीसीटीव्ही व्यवस्था आणि परीक्षा केंद्रांचे नियोजन यासाठी पुन्हा मोठा खर्च करावा लागणार आहे.
दरम्यान, पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू असून, नवीन परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. लाखो उमेदवार आणि विशेषतः कार्यरत शिक्षक आता नव्या वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत आहेत.

