(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा महामार्गावरील नियोजनशून्य आणि निकृष्ट दर्जाच्या कामाचा फटका पुन्हा एकदा संगमेश्वर तालुक्याला बसला आहे. पहिल्याच मुसळधार पावसात सोनवी परिसर जलमय झाला असून, महामार्गालगत पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सक्षम व्यवस्था नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून आणि दुकानांमधून वाहू लागले. या प्रकारामुळे व्यापारी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दुकानांतूनच वाहू लागले पाण्याचे प्रवाह
महामार्गाच्या कामादरम्यान पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक गटारे व जलवाहिन्यांचे नियोजन करण्यात आले नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. परिणामी, रस्त्यावर साचलेले पाणी थेट महामार्गालगतच्या दुकानांमध्ये घुसले. काही ठिकाणी दुकानांमधूनच पाण्याचे वेगवान प्रवाह वाहू लागल्याने व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पाण्यामुळे अनेकांना माल सुरक्षित करण्यासाठी धावपळ करावी लागली.
देवरुख मार्ग आणि पायवाट धोकादायक
महामार्गावरून वाहणारे पाणी देवरुखकडे जाणाऱ्या जोडरस्त्यावर तसेच नागरिकांच्या पायवाटेवरही पसरले आहे. त्यामुळे संपूर्ण परिसराला नदीचे स्वरूप प्राप्त झाले असून, वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेणे कठीण झाले आहे. पादचारी आणि शाळकरी विद्यार्थ्यांनाही पाण्यातून मार्ग काढताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिकांचा संताप; तातडीने उपाययोजनांची मागणी
महामार्गाच्या अपुऱ्या नियोजनामुळे दरवर्षी नागरिकांना अशा समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, तसेच संबंधित कामाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

