(गुहागर /रत्नागिरी प्रतिनिधी)
पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग मनात धरून एका दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने आपल्या ६६ वर्षीय वृद्ध आईवर लोखंडी गाडीच्या पाट्याने जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक घटना गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे गावात घडली आहे. या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून आरोपी मुलाविरुद्ध गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी पार्वती शंकर गावडे (वय ६६, रा. गावडेवाडी, पाटपन्हाळे) असून त्यांचा मुलगा राजेंद्र शंकर गावडे (वय ४२, सध्या रा. दिवा, ठाणे) याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र गावडे हा वारंवार मद्यप्राशन करून घरी येत असे. त्यानंतर तो आईला शिवीगाळ करणे, मारहाण करणे तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून पार्वती गावडे यांनी यापूर्वी गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याच तक्रारीचा राग मनात ठेवून आरोपीने गुरुवारी (४ जून) सकाळी साडेआठच्या सुमारास घरात वाद घालत लोखंडी गाडीचा पाटा उचलला. “पोलीसांत तक्रार करतेस काय?” असे म्हणत त्याने आईच्या पायावर आणि ढोपराखाली जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात पार्वती गावडे गंभीर जखमी झाल्या. त्यानंतरही आरोपीने शिवीगाळ करत पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर जखमी महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून गुहागर पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. वृद्धापकाळात आधार देण्याऐवजी मुलाकडूनच झालेल्या या अमानुष मारहाणीची चर्चा तालुक्यात सुरू असून पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

