(संगमेश्वर / एजाज पटेल)
फुणगूस खाडीपट्ट्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसासह सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने मोठा हाहाकार माजवला असून आंबा बागायतदारांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. सतत बदलणारे हवामान, मोहोर जळणे, फलधारणा गळती आणि उत्पादनात झालेली मोठी घट यामुळे बागायतदार आधीच आर्थिक संकटात सापडला होता. त्यातच अचानक कोसळलेल्या अवकाळी पावसाने उरलीसुरली आशाही हिरावून घेतली आहे.
फुणगूससह कोंडये, मांजरे, मेढे, डावखोल तसेच डिंगणी परिसरातील गावांना या नैसर्गिक संकटाचा सर्वाधिक फटका बसला आहे. तयार झालेला आंबा मोठ्या प्रमाणात झाडांवरून गळून पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडेही कोलमडून पडली असून बागायतदारांचे वर्षभराचे नियोजन एका झटक्यात उद्ध्वस्त झाले आहे.
आधीच संकटात सापडलेल्या बागायतदारांना शासन आणि प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा होती. मात्र नुकसान होऊन इतके दिवस उलटूनही अद्याप महसूल किंवा कृषी विभागाचे अधिकारी पंचनाम्यासाठी फिरकले नसल्याने बागायतदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शासनाने मदतीची मोठमोठी आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या मते, प्रशासन सध्या केवळ कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त असून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचण्यास तयार नाही. बड्या नेत्यांच्या दौऱ्यांत गुंतलेल्या अधिकाऱ्यांना सामान्य बागायतदारांच्या समस्यांकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून केला जात आहे.
पंचनामे रखडल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत असून आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा संताप आता उफाळून येत आहे. कोंडये, मांजरे आणि डिंगणी परिसरातील ग्रामस्थांनी शासनाच्या उदासीन कारभारावर सडकून टीका केली आहे.
“आता तरी शासन कुंभकर्णी झोपेतून जागे होणार का? की निवडणुका आल्या कीच शेतकऱ्यांची आठवण काढणार?” असा संतप्त सवाल बागायतदारांकडून उपस्थित केला जात आहे.

