(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा, रत्नागिरी आगार आणि टीआरपी येथून सेवानिवृत्त झालेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांचा तालुकास्तरीय स्नेहमेळावा रविवारी (२८ जून) दत्त मंगल कार्यालय, रत्नागिरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शेखर सावंत होते.
या स्नेहमेळाव्यास सुमारे १५० सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. जून महिन्यात वाढदिवस असलेल्या सुमारे ४५ सभासदांचा शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तसेच निवृत्तीनंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सभासदांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला संघटनेचे केंद्रीय संयुक्त सचिव तथा रत्नागिरी विभागीय सचिव पी. एस. जाधव, प्रादेशिक सचिव विजयराव शिंदे आणि केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक थत्ते प्रमुख उपस्थित होते.
प्रास्ताविकात पी. एस. जाधव यांनी सेवानिवृत्त सहकाऱ्यांना एकत्र आणणे, परस्परांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि संघटनेच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संवादाचे व्यासपीठ निर्माण करणे हा स्नेहमेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. त्यांनी संघटनेच्या केंद्रीय स्तरावर सुरू असलेल्या विविध उपक्रमांची आणि प्रलंबित प्रश्नांबाबत सुरू असलेल्या पाठपुराव्याची माहितीही दिली.
विजयराव शिंदे यांनी संघटित राहण्याचे महत्त्व विशद करत, संघटनेच्या माध्यमातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रभावीपणे मार्गी लागत असल्याचे सांगितले. अशोक थत्ते यांनी प्रलंबित आर्थिक देयके मिळविण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती आणि त्याबाबतची माहिती उपस्थितांना दिली.
अध्यक्षीय समारोपात शेखर सावंत यांनी रत्नागिरी युनिटच्या कार्यकारिणीने मेळावा यशस्वी करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक केले.
कार्यक्रमाची सुरुवात भारत सावंत यांनी स्वागतगीत आणि महाराष्ट्र गीताने केली. राजकुमार प्रधान यांनी कविता सादर केली, तर सुहास पेठे यांनी देशभक्तीपर गीत सादर करून वातावरण भारावून टाकले. उदय पारकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर एम. आय. शेकासन यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. ही माहिती संघटनेचे राज्य प्रसिद्धी सचिव रत्नपाल जाधव यांनी दिली.

