(रत्नागिरी)
राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज (रविवारी) नवीन रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाला भेट देत विविध प्रवासी आणि कर्मचारी सुविधांची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी बसस्थानकातील हिरकणी कक्ष, चालक-वाहक विश्रांतीगृह, स्वच्छतागृहे तसेच प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले नवीन रत्नागिरी बसस्थानक सुमारे १३,१२०.५८ चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारण्यात आले आहे. बसस्थानकात २० फलाट, प्रशस्त प्रतीक्षालये, व्यापारी आस्थापने, पार्किंग व्यवस्था, स्वतंत्र प्रशासकीय कक्ष तसेच चालक-वाहकांसाठी सुसज्ज विश्रांतीगृह उपलब्ध करून देण्यात आले आहे. सुमारे २३.४२ कोटी रुपये खर्चून साकारलेल्या या प्रकल्पामुळे रत्नागिरीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे.
पाहणीदरम्यान श्री. सरनाईक यांनी बसस्थानक परिसरातील स्वच्छता, बांधकामाचा दर्जा आणि प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच काही किरकोळ बाबींवर अधिक लक्ष देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. विशेषतः स्वच्छतेची सातत्यपूर्ण देखभाल, प्रवासी सुविधांचा दर्जा आणि कर्मचारी कल्याणाशी संबंधित सुविधांचा प्रभावी वापर यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी बोलताना श्री. सरनाईक म्हणाले, “रत्नागिरीसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यात उभारण्यात आलेले हे आधुनिक बसस्थानक एसटी महामंडळाच्या प्रगत आणि प्रवासी-केंद्रित दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन उभारलेल्या या प्रकल्पामुळे वाहतूक सेवेला निश्चितच नवे परिमाण प्राप्त होईल.”
यावेळी त्यांनी उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले. “रत्नागिरीच्या विकासासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार केला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्याला आधुनिक आणि दर्जेदार बसस्थानकाची भेट मिळाली असून त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो,” असेही ते म्हणाले.
नवीन रत्नागिरी बसस्थानकामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून कोकणातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

