(गणपतीपुळे / वैभव पवार)
बौद्ध धम्मातील भंते संघाचे जीवन, त्यांची साधना, शिस्तबद्ध धार्मिक आचारसंहिता आणि धम्मप्रसाराची परंपरा यांचा प्रत्यक्ष अनुभव ग्रामीण भागातील बौद्ध बांधवांना मिळावा या उद्देशाने खंडाळा येथील दीक्षाभूमी बुद्ध विहारात २१ मे ते ३० मे २०२६ या कालावधीत दहा दिवसीय श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात प्रथमच अशा प्रकारचे व्यापक स्वरूपाचे श्रामणेर शिबिर आयोजित करण्यात येत असल्याने बौद्ध समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे शिबिर बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी, बावीस खेडी बौद्धजन संघ वाटद-खंडाळा तसेच सम्राट फाउंडेशन वाटद-खंडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले असून बावीस खेडी बौद्धजन संघातील सर्व गाव शाखांसह तालुक्यातील तमाम बौद्ध बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बौद्ध धम्मात भंते संघाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य भंते संघ करत असतो. या भंते संघामध्ये प्रवेशाची पहिली पायरी म्हणजे “श्र्रामणेर” अवस्था मानली जाते. श्रामणेर जीवन कसे असते, भंते संघातील दैनंदिन जीवनशैली, साधना, शिस्त, त्याग आणि धार्मिक जीवनाचे स्वरूप काय असते याची सखोल माहिती आणि प्रत्यक्ष अनुभव शिबिरार्थींना या शिबिरातून मिळणार आहे.
ग्रामीण भागातील युवक आणि बौद्ध बांधवांना बौद्ध धम्माची सखोल ओळख व्हावी, त्यांच्यात धम्माविषयी जागृती निर्माण व्हावी आणि बौद्ध संस्कृती व परंपरेबाबत अभ्यासपूर्ण दृष्टिकोन विकसित व्हावा या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
सदर शिबिरासाठी १५ ते ५५ वर्षे वयोगट निश्चित करण्यात आला असून शिबिर दीक्षाभूमी बुद्ध विहार, वाटद-खंडाळा येथे दहा दिवस चालणार आहे. या शिबिरात सहभागी होणाऱ्या शिबिरार्थींना धार्मिक शिस्त, ध्यान, धम्म अभ्यास, प्रार्थना, संघजीवन आणि भंते जीवनशैली याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
या शिबिराला अजाहत मिलिंद बोधी (जेहूर, अहमदनगर), भंते संघकीर्ती मुनी (बुद्धगया, बिहार) तसेच भिक्खू परमानंद (पुणे) यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. त्यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक सत्रांचे आयोजन करण्यात येणार असल्याने शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
शिबिरासाठी नोंदणी केलेल्या सर्व शिबिरार्थींनी २० मे रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. राजेश जाधव (मो. ९४२१२३३५४९), कुलदीप जाधव (सचिव, बावीस खेडी बौद्धजन संघ), सुनील उर्फ भाई जाधव (अध्यक्ष, बावीस खेडी बौद्धजन संघ), बौद्धाचार्य दीपक गमरे, प्रकाश रामचंद्र पवार (तालुकाध्यक्ष, बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी), सुरेश सुर्वे गुरुजी, सुहास कांबळे (सचिव, तालुका शाखा रत्नागिरी), संदीप जाधव बौद्धाचार्य, नितीन सुर्वे (सिद्धार्थ फोटो स्टुडिओ) तसेच सामाजिक कार्यकर्ते दीपक पवार यांच्याशी संपर्क साधावा, असेही आयोजकांनी कळविले आहे.
या दहा दिवसीय श्रामणेर शिबिरात अधिकाधिक बौद्ध बांधवांनी सहभागी होऊन बौद्ध धम्माच्या अभ्यासाचा आणि धार्मिक जीवनशैलीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी, बावीस खेडी बौद्धजन संघ वाटद-खंडाळा आणि सम्राट फाउंडेशन वाटद-खंडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

