(रत्नागिरी / वार्ताहर)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासोबत पर्यावरण संवर्धनालाही चालना देण्याच्या उद्देशाने तळकांटे सप्तलिंगी ते बावनदी या मार्गावर दुतर्फा वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. सामंत यांनी ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधत या पर्यावरणपूरक उपक्रमाचे स्वागत केले.
विकास आणि पर्यावरणाचा समतोल आवश्यक
यावेळी बोलताना डॉ. उदय सामंत म्हणाले, “महामार्ग उभारणे हा विकासाचा भाग असला, तरी त्याचवेळी पर्यावरणाचा समतोल राखणे आणि परिसराचे नैसर्गिक सौंदर्य जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. विकासामुळे झालेल्या पर्यावरणीय परिणामांची भरपाई करण्यासाठी व्यापक वृक्षारोपण आवश्यक आहे.”
महामार्गाच्या कामादरम्यान ज्या झाडांची तोड झाली, त्याची भरपाई म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येत आहे. शासनाचा हा मार्ग ‘हरित महामार्ग’ (Green Highway) म्हणून विकसित करण्याचा संकल्प असून, लोकसहभागातून संपूर्ण परिसर अधिक हिरवागार आणि पर्यावरणपूरक बनविण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वृक्षारोपण उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी बंड्याशेठ साळवी, अभिजित हेगशेट्ये, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव, तळकांटेच्या सरपंच सुषमा बने, प्रांताधिकारी जीवन देसाई, शरद कदम तसेच तळकांटे गावातील ग्रामस्थ आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

