(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, फर्निचर व अंतर्गत सजावटीची कामे पूर्ण झाल्यानंतरच या इमारतीत प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार आहे. यासाठी शासनाकडून सुमारे २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असला, तरी तो प्रत्यक्ष प्राप्त झाल्यानंतरच पुढील प्रक्रियेला वेग येणार आहे. त्यामुळे चार वर्षांनंतर निवडून आलेल्या नव्या सदस्यांचा या इमारतीतील गृहप्रवेश पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हा परिषदेच्या भव्य इमारतीसाठी प्रारंभी ५८ कोटी रुपयांचा निधी महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आला होता. तत्कालीन अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या पुढाकारातून या प्रकल्पाला गती मिळाली आणि कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. आता इमारतीचे मुख्य बांधकाम पूर्णत्वास आले असून, उर्वरित अंतर्गत कामांसाठी स्वतंत्र निधीची आवश्यकता भासू लागली होती. दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांतून फर्निचर व अंतर्गत सुविधांसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी प्रत्यक्ष जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाल्यानंतर इमारतीतील सजावटीची आणि आवश्यक यांत्रिक सुविधांची कामे हाती घेतली जाणार आहेत.
दरम्यान, नव्या इमारतीची रचना आधुनिक प्रशासकीय गरजांचा विचार करून करण्यात आली आहे. बेसमेंट, तळमजला आणि त्यावर सहा मजले अशी ही इमारत उभारण्यात आली असून, सुमारे १०,०८० चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम आहे. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र कार्यालये, सर्वसाधारण सभांसाठी प्रशस्त सभागृह, समिती बैठकींसाठी स्वतंत्र हॉल, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधा, सुसज्ज महिला कक्ष, उपाहारगृह, पुरेशी पार्किंग व्यवस्था तसेच लिफ्टसारख्या आधुनिक सोयींनी ही इमारत सुसज्ज करण्यात आली आहे. या सर्व सुविधांमुळे जिल्हा परिषदेचे कामकाज अधिक कार्यक्षम आणि गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, निधी प्रत्यक्ष मिळेपर्यंत ‘नव्या इमारतीत प्रवेश’ हा काहीसा प्रतीक्षेचाच विषय ठरणार असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे.

