(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांची सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाण्यास महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत १०० सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे. नियमित पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण होऊन प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईपर्यंत ही तात्पुरती व्यवस्था लागू राहणार असून, यासंदर्भातील शासन निर्णय गृह विभागाने जारी केला आहे.
रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात रोहा ते राजापूर रोडदरम्यानची तब्बल ३७ रेल्वे स्थानके येतात. या मार्गावर दररोज सुमारे ७० प्रवासी गाड्या आणि ४० मालगाड्यांची वाहतूक होत असल्याने सुरक्षा यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. वाढती प्रवासी संख्या आणि विस्तीर्ण कार्यक्षेत्र लक्षात घेता उपलब्ध पोलिस मनुष्यबळ अपुरे पडत असल्याची बाब वारंवार अधोरेखित होत होती. या पार्श्वभूमीवर मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्तांनी अतिरिक्त सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. वित्त विभागाच्या उपसमितीने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर गृह विभागाने त्यास अंतिम मंजुरी दिली.
शासन निर्णयानुसार, १२ जून २०२६ पासून पुढील दोन वर्षांसाठी अथवा नियमित पोलिस भरती पूर्ण होऊन आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होईपर्यंत, यापैकी जे आधी घडेल त्या कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत १०० सुरक्षा रक्षक कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यात येणार आहेत. या अतिरिक्त मनुष्यबळामुळे रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाण्याची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असून, कोकण रेल्वेमार्गावरील ३७ स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळ मिळेल. वाढत्या रेल्वे वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा सुरक्षित, सुलभ आणि निर्धास्त प्रवास सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
कोकण रेल्वेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नियमित पोलिस भरतीबरोबरच तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचा हा निर्णय प्रवासी सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने दिलासादायक ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

