(जैतापूर / राजन लाड)
सागरी महामार्गावरील नाटे पोलीस ठाण्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेला एक बैल तब्बल तीन ते चार दिवस रस्त्याच्या कडेला मरणासन्न अवस्थेत पडून होता. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. अनेकांनी हळहळ व्यक्त केली, मात्र प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे आले ते नाटे येथील सी लायन जिमचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते दुष्यंत उर्फ दादू पाथरे.
अक्कलकोट येथून कुटुंबासह परतल्यानंतर त्यांना या जखमी बैलाबाबत माहिती मिळाली. त्यांनी कोणाचीही वाट न पाहता तातडीने सहकाऱ्यांशी संपर्क साधला आणि घटनास्थळी धाव घेतली.
बैलाची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच त्यांनी स्थानिक पशुवैद्यकीय डॉक्टरांना घटनास्थळी बोलावून प्रथमोपचार करून घेतले. त्यानंतर स्वतः टेम्पोची व्यवस्था करून जखमी बैलाला सुरक्षितपणे रत्नागिरी येथील गोशाळेत पुढील उपचारासाठी दाखल केले. या मदतकार्यात स्थानिक नागरिकांनीही मोलाचे सहकार्य केले.
सोशल मीडियापलीकडे जाऊन माणुसकीचा संदेश
या घटनेने एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. जखमी प्राण्यांचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यापेक्षा त्यांना वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे. दुष्यंत (दादू) पाथरे यांनी कृतीतून ही जबाबदारी पार पाडत माणुसकीचे दर्शन घडवले.
मोकाट जनावरांच्या प्रश्नावर उपाययोजनांची गरज
मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात, वाहनचालकांचे होणारे नुकसान आणि मुक्या प्राण्यांचा जीव धोक्यात येण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी संयुक्तपणे प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. जनावरांसाठी सुरक्षित निवारा, त्यांच्या मालकांची जबाबदारी निश्चित करणे आणि अपघात रोखण्यासाठी ठोस पावले उचलणे ही काळाची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दुष्यंत उर्फ दादू पाथरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखविलेली तत्परता, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, एका मुक्या जीवाला दिलेला हा जीवनाचा आधार म्हणजे आजही समाजात माणुसकी जिवंत असल्याची साक्ष ठरली आहे.

