( पुणे )
नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला आज (सोमवारी) विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. आरोपीला मृत्युदंड की जन्मठेप, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयाने गुरुवारी भीमराव कांबळे याला भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत विविध कलमांखाली दोषी ठरविले. त्यानंतर शिक्षेच्या मुद्द्यावर सरकार पक्ष, बचाव पक्ष आणि मूळ फिर्यादी यांच्या वतीने स्वतंत्र युक्तिवाद करण्यात आला.
शिक्षेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयात एक महत्त्वाचा प्रसंग घडला. आरोपीला पिंजऱ्यात उभे करून न्यायाधीशांनी विचारले, “तुला हा संपूर्ण प्रसंग आठवतो का? आता तूच सांग, तुला कोणती शिक्षा द्यायची?” यावर भीमराव कांबळे याने पुन्हा आरोप नाकारत, “मी त्या दिवशी त्या मुलीला गाठीशेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी माझा पाय घसरून पडला आणि तिच्या डोक्यालाही मार लागला. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती सतत रडत होती,” असे न्यायालयात सांगितले.
त्यावर न्यायाधीशांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “आता तू जे सांगतो आहेस तो इतिहास झाला आहे. तुझ्यावरचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला आहे. आता तुला कोणती शिक्षा द्यायला हवी?” मात्र, या प्रश्नावर आरोपीने कोणतेही उत्तर दिले नाही. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला खाली बसण्यास सांगितले.
सरकार पक्षाचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी हा गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ स्वरूपाचा असल्याचे सांगत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा दाखला देत त्यांनी आरोपीमध्ये सुधारण्याची कोणतीही शक्यता नसल्याचा दावा केला.
सरकार पक्षाच्या म्हणण्यानुसार, आरोपीने नियोजनपूर्वक चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी तिची हत्या केली. डीएनए अहवाल, न्यायवैद्यकीय पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे हा गुन्हा सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. तपासात मुलीच्या शरीरावर १८ गंभीर जखमा आढळल्याचेही समोर आले.
सरकारी पक्षाने आरोपीच्या पूर्वीच्या गुन्हेगारी इतिहासाचाही उल्लेख केला. “हा आरोपी समाजासाठी धोकादायक असून तो सुधारण्याच्या पलीकडे गेला आहे. यापूर्वीच्या दोन गुन्ह्यांत तो सुटला असला, तरी या प्रकरणात फक्त फाशीची शिक्षा योग्य ठरेल,” असा युक्तिवाद सरकार पक्षाने केला.
दुसरीकडे, बचाव पक्षाने संपूर्ण प्रकरणातील पुरावे परिस्थितीजन्य असल्याचा दावा केला. आरोपीचे वय ६५ वर्षे असून तो स्वतःही या घटनेमुळे मानसिक धक्क्यात असल्याचे सांगत, इतक्या वयातील व्यक्ती इतका क्रूर गुन्हा करू शकते का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे मृत्युदंडाऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी बचाव पक्षाने न्यायालयाकडे केली.
या बहुचर्चित प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला मृत्युदंड की जन्मठेप, याचा अंतिम निर्णय आज (सोमवारी) विशेष न्यायालयाकडून जाहीर केला जाणार आहे.

