(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
हातखंबाहून रत्नागिरीच्या दिशेने मोठ्या काळ्या दगडांची ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या डंपरने सोमवारी ( दिनांक २२जून २०२६ ) खेडशी परिसरात भीषण अपघात घडवून आणला. रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवून उभ्या असलेल्या दाम्पत्याला डंपरने चिरडल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ओव्हरलोड वाहतुकीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डंपर चालक (क्रमांक MH 08 BK 4099) हा मिऱ्या नागपूर महामार्गावरून हातखंबा परिसरातून रत्नागिरीच्या दिशेने मोठ्या दगडांची वाहतूक करत होता. सोमवारी सकाळी सुमारे पावणेबारा वाजण्याच्या सुमारास खेडशीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डंपर प्रथम रस्त्यालगतच्या कठड्याला घासून त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीवर आदळला. त्यानंतर डंपर थेट रस्त्याखाली पलटी झाला. विशेष म्हणजे, याच ठिकाणी सकाळी अकराच्या सुमारास एका रिक्षाचा अपघात झाला होता. रिक्षा रस्ता सोडून कठड्याबाहेर जाऊन खालच्या बायपास मार्गावर पलटी झाल्याने घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली होती. अनेक जण अपघातग्रस्त रिक्षा पाहण्यासाठी थांबत होते.
दरम्यान, जाकादेवीतील खालगाव येथील प्रज्वल पांचाळ (वय २९रा. खालगाव, जाकादेवी, रत्नागिरी) हे आपल्या पत्नी प्रांजल पांचाळ यांच्यासह दुचाकीवरून रत्नागिरीकडे जात होते. रिक्षाचा अपघात पाहण्यासाठी त्यांनी देखील दुचाकी (MH08 AW 0566) रस्त्याच्या कडेला थांबवली होती. मात्र, त्याचवेळी मागून मोठे दगड घेऊन ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या डंपरने नियंत्रण गमावत थेट त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ओव्हरलोड वाहतूक करणारा डंपर हा के. एस. पवार यांच्या मालकीचा असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या भीषण धडकेत प्रांजल पांचाळ ( वय २७, रा. खालगाव, जाकादेवी, रत्नागिरी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रज्वल पांचाळ गंभीर जखमी झाले. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, प्रांजल पांचाळ या डंपरखाली अडकून पडल्या होत्या. दुर्घटनेनंतर परिसरात हृदयद्रावक वातावरण निर्माण झाले. जवळपास अर्धा तास बचावकार्य सुरू होते.
अखेर क्रेनच्या सहाय्याने डंपर बाजूला करण्यात आला. त्यानंतर महिला पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार बाजी कदम आणि अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलिस उपनिरीक्षक अभय तेली, भिसे, कोकरे, बोराडे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. अपघातानंतर अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी यांनीही घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनेची पाहणी केली.
काळ कुणाला, कधी आणि कोणत्या रूपाने गाठेल याचा नेम नसतो, याची प्रचिती खेडशी येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेतून आली. सकाळी झालेला रिक्षाचा अपघात पाहण्यासाठी पतीसोबत काही क्षण थांबलेल्या प्रांजल पांचाळ यांना कदाचित कल्पनाही नसेल की, ज्या अपघाताकडे त्या उत्सुकतेने पाहत आहेत, त्याच ठिकाणी काही मिनिटांत नियती त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा रचून बसली आहे. क्षणभरापूर्वी पतीसोबत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या प्रांजल यांच्या आयुष्याचा प्रवास एका भरधाव डंपरच्या धडकेत कायमचा थांबला. एका अपघाताचे दृश्य पाहणाऱ्या प्रांजल याच दुसऱ्या आणि अधिक भीषण अपघाताच्या बळी ठरल्या. त्यांच्या डोळ्यांसमोरचे जग एका क्षणात अंधारून गेले आणि पांचाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. “दुसऱ्याचा अपघात पाहण्यासाठी थांबल्या आणि स्वतःच अपघाताच्या गर्तेत सापडल्या,” ही बाब प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारी ठरली आहे. प्रांजल पांचाळ यांच्या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बेफाम आणि बेजबाबदार ओव्हरलोड वाहतुकीने आणखी एका कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, हातखंबा-रत्नागिरी मार्गावर दिवस-रात्र सुरू असलेल्या ओव्हरलोड डंपर वाहतुकीबाबत नागरिकांकडून वारंवार तोंडी तक्रारी करण्यात येत आहेत. मात्र, त्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. सोमवारी घडलेली ही दुर्घटना म्हणजे बेफाम आणि ओव्हरलोड वाहतुकीचा परिणाम असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून, जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पांचाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ओव्हरलोड वाहतुकीकडे दुर्लक्ष केल्यास अशा दुर्घटना पुन्हा घडू शकतात, अशी भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
चालक आणि मालकांकडून या नियमांची सर्रास पायमल्ली
या अपघातामधून ओव्हरलोड डंपर वाहतुकीतील बेजबाबदारपणाचा आणखी एक धक्कादायक पैलू समोर आला आहे. अपघातग्रस्त डंपरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक दगड भरलेले होतेच, शिवाय त्या मालावर नियमानुसार ताडपत्रीही झाकण्यात आलेली नव्हती. वाहतूक नियमांनुसार बांधकाम साहित्य, दगड किंवा खडीची वाहतूक करताना माल सुरक्षितपणे बांधणे आणि त्यावर ताडपत्री घालणे बंधनकारक असतानाही अनेक डंपर चालक आणि मालकांकडून या नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या या प्रकारामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.
अपघातस्थळी गर्दी जीवघेणी ठरू शकते
महामार्गावर अपघात घडल्यानंतर अनेक जण कुतूहलापोटी घटनास्थळी थांबून पाहण्यासाठी गर्दी करतात. काहीजण वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून अपघाताचे दृश्य पाहत राहतात. मात्र अशा प्रकारची गर्दी वाहतुकीस अडथळा निर्माण करण्याबरोबरच आणखी अपघातांना निमंत्रण देणारी ठरू शकते. अपघात झालेल्या ठिकाणी वाहनांचा वेग कायम असतो. त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभे राहून अपघात पाहणारे नागरिक, त्यांची वाहने आणि बचावकार्य करणाऱ्या यंत्रणांनाही धोका निर्माण होतो. अनेकदा मूळ अपघातापेक्षा त्यानंतरची गर्दी आणि गोंधळ अधिक गंभीर परिस्थिती निर्माण करतो. अपघात दिसल्यास नागरिकांनी सुरक्षित अंतर राखून तातडीने पोलीस, रुग्णवाहिका किंवा संबंधित यंत्रणांना माहिती द्यावी. मदतीची आवश्यकता असल्यास ती करावी; मात्र केवळ पाहण्यासाठी गर्दी करणे टाळावे. अपघातस्थळी शिस्त आणि संयम राखल्यास अनेक दुय्यम अपघात टाळता येऊ शकतात आणि बचावकार्यही अधिक प्रभावीपणे पार पडू शकते.

