आज, सोमवार 29 जून 2026 रोजी देशभरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली जात आहे. विवाहित महिलांसाठी हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्यासाठी महिला या दिवशी वटसावित्रीचे व्रत करून वडाच्या झाडाची पूजा करतात.
वटपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व
पौराणिक कथेनुसार, माता सावित्रीने आपल्या दृढ निश्चय, बुद्धिमत्ता आणि पतिव्रत धर्माच्या बळावर यमराजांकडून पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले. ही घटना ज्येष्ठ पौर्णिमेला घडल्याचे मानले जाते. त्यामुळे या दिवसापासून वटसावित्री व्रताची परंपरा सुरू झाली. वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच महिलांनी वडाला प्रदक्षिणा घालून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याची परंपरा आहे.
वटपौर्णिमा 2026 शुभ मुहूर्त
- पौर्णिमा तिथी प्रारंभ: सोमवार 29 जून 2026, पहाटे 3:06 वाजता
- पौर्णिमा तिथी समाप्त: मंगळवार 30 जून 2026, पहाटे 5:26 वाजता
- मुख्य पूजा मुहूर्त: सकाळी 8:24 ते 10:40
- अभिजीत मुहूर्त: सकाळी 11:55 ते दुपारी 12:48
आजचे पंचांग (29 जून 2026)
- वार: सोमवार
- तिथी: पौर्णिमा
- नक्षत्र: मूळ
- राहूकाळ: सकाळी 7:40 ते 9:20
- अमृतकाळ: दुपारी 2:18 ते 3:58
- सूर्योदय: सकाळी 6:01
- सूर्यास्त: सायंकाळी 7:17
वटपौर्णिमा पूजेसाठी लागणारे साहित्य
- हळद, कुंकू, अक्षता
- कच्चा धागा किंवा सूत
- फुले, हार, पाने
- नारळ, सुपारी
- पंचामृत
- तुपाचा किंवा तेलाचा दिवा
- अगरबत्ती, धूप
- फळे, मिठाई किंवा गोड नैवेद्य
- पाण्याने भरलेला कलश
- सावित्री-सत्यवान यांचे चित्र किंवा मूर्ती
- काळे मणी, बांगड्या, मंगळसूत्र, ब्लाऊज पीस, गहू
वटपौर्णिमा पूजा विधी
- सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ व पारंपरिक वेशभूषा धारण करा.
- घरातील देवतांची पूजा करून वटवृक्षाजवळ जा.
- सावित्री-सत्यवानाची पूजा करा.
- वडाच्या झाडाला पाणी अर्पण करा.
- झाडाभोवती कच्चा धागा गुंडाळत सात प्रदक्षिणा घाला.
- हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि नैवेद्य अर्पण करा.
- पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा.
- सावित्री व्रत कथा वाचा किंवा ऐका.
- पाच सुवासिनींना हळद-कुंकू लावून वाण द्या आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या.
सात प्रदक्षिणांचे महत्त्व
वटवृक्षाभोवती सात प्रदक्षिणा घालणे हे सात जन्मांच्या अखंड सहजीवनाचे प्रतीक मानले जाते. या वेळी महिला पतीच्या दीर्घायुष्य, सुखी संसार आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात.
व्रताचे महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार, वटपौर्णिमेचे व्रत केल्याने पतीचे आयुष्य वाढते, वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी नांदते आणि कुटुंबावर येणारी संकटे दूर होतात. त्यामुळे हा दिवस विवाहित महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा मानला जातो.

