( नवी दिल्ली )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तांना दिवाळीपूर्वी दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. महागाई भत्ता (डीए) आणि महागाई सवलत (डीआर) यामध्ये ३ टक्क्यांची वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ही वाढ १ जुलै २०२५ पासून लागू होईल आणि पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात येणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के झाला आहे.
सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलै या दोन हप्त्यांमध्ये डीए आणि डीआरचा आढावा घेते. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात व पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. उदाहरणार्थ, ३०,००० रुपये मूळ पगार असलेल्या कर्मचाऱ्याला दरमहा ९०० रुपये तर ४०,००० रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्याला १,२०० रुपये अतिरिक्त मिळतील. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांची थकबाकी दिवाळीपूर्वी ऑक्टोबरच्या पगारासह दिली जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना २,७०० ते ३,६०० रुपये अतिरिक्त लाभ मिळणार आहे. या वाढीमुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी सुमारे ६,६१४.०४ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.
इतर महत्त्वाचे निर्णय :
- १७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५७ नवीन केंद्रीय विद्यालयांना (केव्ही) मान्यता.
- राष्ट्रीय महामार्ग-७१५ च्या कालियाबोर-नुमालीगड (८६ किमी) चौपदरीकरणासाठी ६,९५७ कोटी रुपये मंजूर. यामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात ३४ किमी एलिव्हेटेड व्हायाडक्टचा समावेश.
- बायोमेडिकल रिसर्च करिअर प्रोग्राम (फेज-३) साठी १,५०० कोटी रुपयांना मंजुरी.
- ‘वंदे मातरम’ या गाण्याच्या १५० व्या वर्षाच्या उत्सवाला हिरवा कंदील.

