(चिपळूण)
सामाजिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंजिता ओतारी यांना व्हिजन थ्री न्यूज चॅनलतर्फे प्रतिष्ठेचा ‘लोकप्रेरणा पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या दिमाखदार सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
रंजिता चॅरिटेबल फाउंडेशनच्या अध्यक्षा रंजिता ओतारी या महिला सक्षमीकरण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, आरोग्य व नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन, आरोग्य जनजागृती, गरजू नागरिकांना मदत तसेच विविध लोकहिताच्या प्रश्नांबाबत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या या समाजाभिमुख आणि निस्वार्थ कार्याची दखल घेत त्यांना ‘लोकप्रेरणा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
यावेळी सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम, व्हिजन थ्री न्यूज चॅनलचे संपादक राजेंद्रकुमार शिंदे, ऋतुजा शिंदे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी रंजिता ओतारी यांच्या समाजसेवेतील योगदानाचे कौतुक करत, त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा गौरव केला आणि भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

