(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक येथे एका अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या अत्याचारामुळे पीडित बालिका गरोदर राहिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी वेल्डिंगचे काम करणाऱ्या मूळच्या उत्तर प्रदेशातील आरोपीला अटक केली असून, देवरुख न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंद विजयकुमार चौहान असे या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून सुरुवातीला कामानिमित्त रत्नागिरीत राहत होता. गेल्या दोन महिन्यांपूर्वीच तो निवे बुद्रुक येथे राहायला आला होता. पीडित बालिकेचे कुटुंबही मूळचे उत्तर प्रदेशचे असून ते याच परिसरात वास्तव्यास आहेत. एकाच राज्यातील असल्याने आरोपीची बालिकेशी ओळख झाली. याच ओळखीचा गैरफायदा घेत, घरात कोणीही नसून ती एकटीच असल्याची संधी साधून आरोपी आनंदने तिच्यावर अत्याचार केले.
काही दिवसांनी बालिकेच्या पोटात अचानक दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती काही महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. कुटुंबीयांनी विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली. देवरुख पोलीस ठाण्यात पोक्सा कायद्यांतर्गत ‘झिरो नंबर’ने गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपी आनंद चौहानला गजाआड केले. न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची कोठडी देण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे करत आहेत.

