(रायगड)
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाट परिसरात जुन्या मार्गावर काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या केबल टाकण्याच्या कामानंतर केलेला भराव पहिल्याच मुसळधार पावसात वाहून गेल्याने साईड पट्टी खचण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
जुन्या कशेडी बंगल्यापासून भोगावपर्यंतच्या पट्ट्यात केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले होते. त्यानंतर करण्यात आलेला भराव निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पहिल्याच पावसात भरावातील माती वाहून गेल्याने रस्त्यालगत चिखल साचला असून वाहनचालक आणि गुरेढोरे घेऊन जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिक चंद्रकांत जाधव यांनी या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. पावसाळ्यात गुरे रस्त्यालगतच्या भागात घसरून गटारात अडकण्याची आणि जखमी होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. निकृष्ट कामामुळे भविष्यात अपघात किंवा नुकसान झाल्यास जबाबदारी कोणाची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, जून अखेरीस सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई–गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी साईड पट्ट्या खचल्याचे चित्र दिसून येत आहे. काही दिवसांत रस्ता निसरडा झाल्याने वाहने घसरून अपघातांच्या घटना घडल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही माती रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. रायगड जिल्ह्यात एका दिवसात अपघातांच्या अनेक घटना घडल्याने सुरक्षिततेचा मुद्दा अधिक गंभीर झाला आहे.
या पार्श्वभूमीवर महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदारांनी तातडीने पाहणी करून साईड पट्ट्यांची दुरुस्ती करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

