(संगमेश्वर / मिलिंद देसाई)
श्री गणेश वेदपाठ शाळा, देवरुख येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात स्टेट बँक ऑफ इंडिया, देवरुख शाखेचे व्यवस्थापक श्री. निखिल भिडे आणि श्री. मदन मोडक यांच्या हस्ते विविध प्रकारची रोपटी लावण्यात आली. या वेळी काजू, रातांबे, चिकू, पेरू, चिंच, नारळ, वड आणि पिंपळ यांसारखी उपयुक्त झाडे लावण्यात आली.
सदर उपक्रमासाठी लागणारा संपूर्ण खर्च तसेच खड्डे खोदणे आणि रोपणाची व्यवस्था श्री. मदन वामन मोडक आणि श्री. हेमंत श्रीपाद तांबे यांनी केली. त्यांच्या सहकार्यामुळे पाठशाळेला मोठे योगदान लाभले. काही कारणास्तव श्री. तांबे उपस्थित राहू शकले नाहीत. कार्यक्रमास SBI व्यवस्थापक श्री. भिडे, श्री. मोडक, वेदमूर्ती विज्जल आचार्य गुरुजी, विश्वस्त श्री. प्रकाश पत्की, श्री. मिलिंद जुवेकर, व्यवस्थापक श्री. मोहन कुलकर्णी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
पाठशाळेच्या परिसरालगत असलेल्या नदीकिनारी मागील वर्षी आमदार श्री. शेखर निकम यांच्या पुढाकारातून संरक्षक भिंत उभारण्यात आली होती. त्यामुळे या जागेचा सुयोग्य वापर करून वृक्षारोपण शक्य झाले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री गणेश वेदपाठ शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले.

