(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी)
चिपळूण तालुक्यातील गांगराई परिसरात सायकल चालविताना उतारावर तोल जाऊन पडल्याने मुंबईतील ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल ग्लेन डिसोजा (वय ५३, रा. भायखळा, मुंबई) हे २६ जून रोजी विजय विठ्ठल भागडे यांच्यासोबत गांगराई परिसरात फिरण्यासाठी आले होते. यावेळी ते एका व्यक्तीची सायकल चालवत असताना उतारावर अचानक तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर त्यांना तातडीने चिपळूण येथील लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

