(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील वेतोशी परिसरात मोकाट गुरांनी भातशेती आणि नाचणी पिकांचे नुकसान केल्याच्या वादातून एका शेतकऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास वेतोशी धनगरवाडी येथील जगदिश कृष्णा झोरे याने मोकाट गुरे फिर्यादीसह गावातील इतर शेतकऱ्यांच्या शेतात सोडल्याचा आरोप आहे. या गुरांनी भातशेती आणि नाचणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. याबाबत जाब विचारण्यासाठी गोविंद शंकर माचिवले (वय ५४, रा. वेतोशी वरचीवाडी) आणि रोहित राजेंद्र माचिवले हे आरोपीकडे गेले असता, आरोपीने उर्मटपणे वागत, “तुम्हाला जे करायचे ते करा,” असे म्हणत वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा इशारा दिल्यानंतर आरोपीने त्यांचा रस्ता अडवून शिवीगाळ केली. त्यानंतर हाताने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १२६(२), ३२४(२), ११५(२), ३५२, ३५१(२) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

