(चिपळूण)
पिंपळी येथील पुलाच्या बांधकामामुळे पेढांबे-खडपोली मार्गावर दिवसा अवजड वाहनांच्या वाहतुकीस घालण्यात आलेल्या बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलिसांनी बुधवारी (२४ जून) तिघा वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सकाळी साडेआठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
चिपळूणचे उपविभागीय अधिकारी यांनी १९ सप्टेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार पिंपळी पुलाच्या कामाच्या पार्श्वभूमीवर पेढांबे-खडपोली मार्गावर दिवसा अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. या मार्गावर रात्री ११.३० ते पहाटे ५.३० या कालावधीतच अवजड वाहनांना वाहतुकीची परवानगी देण्यात आली असून, या आदेशाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, बुधवारी सकाळी बंदीची वेळ सुरू असतानाच ट्रॅक्टर आणि टँकरची वाहतूक करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित वाहनचालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.
या प्रकरणात संतोष प्रकाश काहाडाळ (वय ३४, रा. नाशिक) याच्याविरुद्ध ट्रॅक्टर (एमएच-१० बीआर-९०७२) दिवसा या मार्गावर चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच रोहित भरत पाटील (वय ३४, रा. पडोली ओशी, ता. पाटण, जि. सातारा) याच्याविरुद्ध टँकर (एमएच-५० एन-९४५७) आणि सर्जेराव यशवंत लवटे (वय ५०, रा. देशिंग, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) याच्याविरुद्ध टँकर (एमएच-१० डीटी-७२०७) दिवसा या मार्गावर चालविल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास अलोरे-शिरगाव पोलिस करत आहेत.

