( नवी दिल्ली )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्या मंत्र्यांना बढती मिळणार, कोणाला वगळले जाणार आणि कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातूनही काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व वाढण्याची शक्यता
सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे एकूण सहा मंत्री आहेत. त्यामध्ये दोन कॅबिनेट मंत्री आणि चार राज्यमंत्री आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी फेरबदलात महाराष्ट्रातून मंत्र्यांची संख्या सहा वरून आठ होण्याची शक्यता आहे. चर्चेनुसार, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना प्रत्येकी एक अतिरिक्त मंत्रीपद मिळू शकते.
शिवसेनेत कोणाची लागणार वर्णी?
राजकीय चर्चेनुसार, शिवसेना (शिंदे गट) कडून पक्षाचे संसदीय नेते श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते. तसेच नव्याने निवडून आलेल्या खासदारांमधून संजय जाधव किंवा ओमराजे निंबाळकर यांच्यापैकी एका नेत्याला राज्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे घेणार असल्याचे बोलले जात आहे.
भाजपमध्ये मोठे बदल अपेक्षित नाहीत
भाजपच्या विद्यमान मंत्र्यांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता कमी मानली जात आहे. मात्र, राज्यमंत्रीपदासाठी माया इवनाते किंवा अनिल बोंडे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. त्यांना संधी द्यायची झाल्यास विद्यमान राज्यमंत्र्यांपैकी एखाद्याला मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागू शकते.
अजित पवार गटालाही मिळू शकते कॅबिनेट मंत्रीपद
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे लोकसभा आणि राज्यसभा मिळून आता पाच खासदार आहेत. त्यामुळे या गटाला कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, प्रफुल पटेल यांनी पूर्वी कॅबिनेट मंत्री राहिल्यामुळे राज्यमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे यावेळी कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यास त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री
- नितीन गडकरी – रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री
- पीयूष गोयल – वाणिज्य आणि उद्योग मंत्री
- प्रतापराव जाधव – आयुष (स्वतंत्र प्रभार) तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री
- रामदास आठवले – सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री
- रक्षा खडसे – युवक व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री
- मुरलीधर मोहोळ – सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री
अधिकृत घोषणा अद्याप नाही
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप केंद्र सरकार किंवा भाजपकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या विविध राजकीय सूत्रांमध्ये सुरू असलेल्या चर्चांवर आधारित ही नावे समोर येत असून, अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षश्रेष्ठी घेणार आहेत.

